Thursday, February 19, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोला 'नरनाळा' महोत्सवात कोट्यवधी रुपयांचा चुराडा ! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

अकोला ‘नरनाळा’ महोत्सवात कोट्यवधी रुपयांचा चुराडा ! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

अकोला दिव्य न्यूज : प्रा.मधु जाधव : अकोला जिल्ह्याच्या कुशीत अनेक वर्षांपासून छत्रपती शिवरायांच्या शौर्याची आठवण करून देत अभेद्य व ताठ मानेने उभा असलेला नरनाळा किल्ला म्हणजे, अकोला जिल्ह्याचे वैभवच…! मात्र आजवर , तो दुर्लक्षितच होता म्हणायचा…! साधारण २००६ – ७ च्या दरम्यान, ध्येयनिष्ठ तथा व्यापकदृष्टी असलेले श्रीकर परदेशी जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून लाभले असताना…नरनाळा किल्ल्याचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित व्हावा, त्या माध्यमातून शिवरायांचं शौर्य व कर्तृत्व अधोरेखित व्हावं ; ह्या उदात्त हेतूने नरनाळा महोत्सवाचे आयोजन करण्याचा चंग त्यांनी बांधला.

जिल्ह्यातील संगीत,नृत्य,नाट्य,चित्रकला कलावंत, वन्य अभ्यासक आणि वन्य प्रेमी,वन विभाग तसेच सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्याशी संपर्क साधून विविध बैठका घेऊन वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करीत ‘नरनाळा महोत्सव’ वास्तवात आणण्याचं नक्की केलं… आणि मोठ्या दिमाखात व दर्जेदार स्वरूपात महोत्सव यशस्वीरीत्या कुठलेही गालबोट न लागता पारदर्शकपणेपार पडला… ह्या आगळ्या वेगळ्या महोत्सव सोहळ्याची चर्चा जिल्हा व परिसरात अनेक दिवस होत राहिली….!
अकोला जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी वर्षा मीना व वन विभागाचे उपवन संरक्षक( वन्यजीव ) राहुलसिंह लोटिया या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत यंदाही नरनाळा महोत्सव करण्याचे ठरविले याची भनक काही संधीसाधू तर काही प्रामाणिक समाजसेवकांना कळतच त्यांनी महोत्सवात अलगद शिरकाव केला, भाग घेतला . खरंतर , एवढा मोठा हा महोत्सव साकार करण्यासाठी शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील कलावंतांशी संपर्क करीत त्यांचा बहुमूल्य सल्ला घेऊन हा उपक्रम राबविणे गरजेचे असताना, केवळ जिल्हा प्रशासन व वन विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले. काही वर्षांपूर्वी प्रख्यात सिनेतारका हेमामालिनी व पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांच्या उपस्थितीने वादग्रस्त ठरलेल्या ‘ताडोबा’ महोत्सवात ज्यांनी ‘ को – इव्हेंट मॅनेजर ‘ म्हणून भूमिका पार पाडली ते चंद्रपूरचे सचिन डबले यांच्या ‘डिझायर’ कंपनीला कंत्राट देत, हा महोत्सव उरकण्यात आला.

खरंतर,आधी रीतसर निविदा मागविण्यात आल्या होत्या आणि त्या बऱ्यापैकी आल्याही होत्या पण त्यांची दखल न घेता डिझायर कंपनीला हे कंत्राट देण्यात आल्याचे समजते. कोट्यवधी रुपयाचा चुराडा करीत असताना… महाराष्ट्र राज्यात शिवरायांची महती प्रभावीपणे मांडून शिवसंस्कृती व पोवाडा , गोंधळ , भारूड ,लावणी ह्या लोककला समाजात प्रभावीपणे सादर करू नावलौकिक मिळविणारे, शाहीर देवानंद माळी, ज्येष्ठ लोककलावंत नंदेश उमप, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे व त्यांचा कला संच ,ज्येष्ठ कलावंत व शिवरायाचे विचार आपल्या व्याख्यानातून व नाट्यकलेतून मांडणारे आणि राज्यात गाजत असलेल्या ‘द किरण माने शो ‘ चे किरण माने त्याचप्रमाणे लावणी ह्या लोककलेला नवा आयाम देत, अवघ्या काही वर्षात आपल्या नृत्यकलेने राज्यातील तरुण मनाच्या हृदयात अव्वल स्थान मिळवणारी नृत्यांगना व युवा कलावंत सांची शिंदे त्याचप्रमाणे,
‘ फोक आख्यान ‘ या नव्या माध्यमातून लोककलेचा एक नवा कोरा कलाउपक्रम पुण्याच्या तरुण मंडळींनी उभा करून, त्याचे अनेक प्रयोग राज्यात सादर करीत ‘वाहवा’ मिळवणाऱ्या कला संस्कृती जपणाऱ्या महाराष्ट्रातील मराठमोळ्या कलावंतांना ‘ सोयीस्कररित्या ‘ डावलून, त्या ऐवजी व्यावसायिक रूपाने गल्लाभरूवृत्तीचे म्हणून प्रसिद्ध असलेले गायक कैलाश खेर व ‘इंडियन आयडॉल’ चा विजेता सलमान अली या हिंदी भाषिक गायकांना लाखो रुपये मानधन देत, त्यांना या नरनाळा महोत्सवात आमंत्रित करण्याचे औचित्य मात्र , समजण्यापलीकडचेच म्हणावे लागेल…!

तसेच, कधी काळी गाजलेल्या ‘चला हवा येऊ द्या ‘ पण आता चावून चावून चोथा झालेल्या व अलीकडे सवंग वाटू लागलेल्या कलावंतांना आणि रंगमंचावर माकडचेष्टा करीत शाब्दिक कोलांटउड्या मरणारे स्टॅन्डअप कॉमेडियन गुलाटी ह्यांना ह्या महोत्सवात पाचारण करणे कितपत योग्य होते , म्हणायचे… ?
तीन दिवस चाललेल्या ह्या महोत्सवासाठी जिल्हा व परिसरातील अनेक तथाकथित मान्यवरांना व लोकप्रतिनिधींना VIP / VVIP पासेस पोस्त करण्यात आल्या होत्या. त्यातील काही अती हौशी मान्यवर मात्र, महोत्सवाच्या वाहनस्थळाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या आपल्या चारी वाहनात बसून रंगमंचावर सुरू असलेल्या गायनाचा मदिरापान करीत श्रवणास्वाद घेत होते, असे विश्वसनीय सूत्राकडून कळते… काहींनी तर, चक्क vip कक्षात बसून हे धाडस केलं , असंही समजलं … ज्या अकोट महसूल विभागात हा महोत्सव सोहळा पार पडला त्या विभागाचे उपविभागीय अधिकारी लोणारकर तर बेभान होऊन नाचत आस्वाद घेत होते , म्हणे…!
जिल्हाधिकारी व उपनगर उपवनरक्षक हे अधिकारी (वन्यजीव) हे अमराठी भाषिक आहेत, त्यांना मराठी भाषा, तिची प्रतिष्ठा व सन्मान, मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतीकं आणि विविध लोककला यांची माहिती नसणार , हे साहजिकच आहे … अशावेळी, त्यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अनुभवी व ज्येष्ठ कलावंताचा मोठ्या मनाने सल्ला घेतला असता तर, नरनाळा महोत्सवाची ‘ गरिमा ‘ ही आणखी वाढली असती आणि उत्सवाचा मूळ हेतूही सफल झाला असता.

जिल्हा प्रशासनाने ज्या इव्हेंट मॅनेजरला म्हणजे सचिन डबलेच्या डिझायर कंपनीला जो कंत्राट दिला होता, त्या कंत्राटात नमूद केलेल्या सोयी – सुविधा महोत्सवाच्या दरम्यान त्यांच्याकडून दिल्या गेल्या नाहीत आणि ज्या दिल्या त्या अत्यंत सुमार दर्जाच्या होत्या अशी ओरडच होत आहे असे नाही, तर त्या विरुद्ध रीतसर तक्रारही करण्यात आली आहे ,असे समजते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी देखील महोत्सव नियोजनाच्या वेळी जातीने थोडं लक्ष घातलं असतं तर, नरनाळा महोत्सवाची ही अशी गत झाली नसती. त्यांनी केवळ उद्घाटन प्रसंगी हजेरी लावून चालणार नव्हतं.या महोत्सवासाठी खर्ची पडलेली कोट्यवधीची रक्कम, ही जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या तथा लोकप्रतिनिधींच्या खिशातून दिली गेली नाही. तर ती , विविध करांच्या रूपाने सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावून वसूल केलेल्या महसुलीतील होती, हे विसरून चालणार नाही. यापुढे, असे उपक्रम राबवताना, याआधी जिल्ह्याला लाभलेल्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एकनाथ डवले व श्रीकर परदेशी या विशाल व व्यापक दृष्टीच्या व रचनात्मक कृती करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आदर्श जिल्हा प्रशासनाने घ्यावा…! एक सजग नागरिक व सामाजिक कार्यकर्ता व ज्येष्ठ कलावंत या नात्याने जिल्हा प्रशासनास ही नम्र विनंती आहे….. खर्ची पडणारा एक एक रुपया सार्थकी लागवा, हीच अपेक्षा ठेवून केलेला हा शब्दप्रपंच…!
चूकभूल , देणे घेणे…!
प्रा. मधू जाधव, अकोला

(सदर लेखातील मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!