Wednesday, February 11, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यात मना सज्जना....! हजारो विद्यार्थ्यांचा एकसुरात निनाद

अकोल्यात मना सज्जना….! हजारो विद्यार्थ्यांचा एकसुरात निनाद

अकोला दिव्य न्यूज : शहरातील विविध २० शाळांमध्ये सकाळी एकाच वेळी हजारों विद्यार्थ्यांचा समुहाने, एकसुरात ‘मना सज्जना भक्तीपंथेचि जावे……….. या श्लोकाचा निनादाने वातावरण भारावून गेले होते.आज रामदास नवमीच्या पावन निमित्ताने अकोला शहरात भक्ती आणि संस्कारांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला.

अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या संकल्पनेतून आज बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘समर्थ रामदासांचे ५१ ‘मनाचे श्लोक’ पठनाचा उपक्रम राबविण्यात आला. ‘जागर भक्तीचा’ या विशेष उपक्रमांतर्गत शहरातील २० शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांनी पठणात सहभाग घेतला.

यंदा श्रीरामदास नवमीला ३४४ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा जागर व्हावा, हिंदू संस्कृतीची मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावीत आणि त्यांच्या मनामध्ये संस्कार व राष्ट्रभक्तीची बीजे रुजावीत, या उदात्त हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी प्रत्येक शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी एकत्र जमले आणि “मना सज्जना भक्तीपंथेचि जावे…” या ओजस्वी शब्दांनी परिसर दुमदुमून गेला.

शहरातील खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल,मोहरिदेवी खंडेलवाल हायस्कूल, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, भिकमचंद खंडेलवाल हायस्कूल, मॉं रेणुका मराठी प्राथमिक शाळा, ज्ञानदर्पण इंग्रजी शाळा, अमृत कलश विद्यालय, भारत विद्यालय प्राथमिक व माध्यमिक, विवेकानंद इंग्लिश हायस्कूल, बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा, खंडेलवाल ज्ञान मंदिर, महाराष्ट्र माध्यमिक शाळा , विद्याभारती, डी.वाय.पाटील माध्यमिक शाळा, संताजी इंग्रजी प्राथमिक शाळा, सन्मित्र प्रायमरी स्कूल व हायस्कूल या शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

समूह पठणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, शिस्त आणि आध्यात्मिकतेची जाणीव अधिक दृढ झाली. समर्थांच्या शिकवणीतील आत्मबल, कर्तव्यनिष्ठा आणि सदाचार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजले. अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी श्लोकांचे अर्थही समजावून सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील उपयुक्ततेची जाणीव करून दिली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ब्राह्मण सभेचे अविनाश देव तसेच दि. प्रोफेशनल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र देशपांडे आणि वैशाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शाळा प्रशासन, शिक्षकवृंद आणि पालकांनी या ऐतिहासिक व आध्यात्मिक उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.

संस्कारक्षम, चारित्र्यसंपन्न आणि समाजभान असलेली पिढी घडविण्यासाठी असे उपक्रम काळाची गरज आहेत, असे मत नगरसेवक तथा अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश देव यांनी व्यक्त केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!