अकोला दिव्य न्यूज : घरातील अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत मार्गक्रमण करत, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सचोटीने काम करत आज अकोला शहरच नव्हे तर पश्चिम विदर्भात नावलौकिक प्राप्त ‘राठी पेढेवाला’ या प्रतिष्ठानचा संचालकांनी अखेर प्रतिष्ठित सहकार महर्षी भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कारावर आपले नाव कोरले. उमरखेड येथील सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानाकडून जाहीर करण्यात आलेला हा पुरस्कार नुकत्याच पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात कृष्णा भवरलाल राठी यांना प्रदान करण्यात आला.

उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सहकार महर्षी भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार आधुनिक शेती, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी दिला जातो.
कृषी क्षेत्रात आधुनिक, नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराअंतर्गत कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव केला जातो. यासोबतच कृषी उद्योजक, विद्यार्थी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांचा कार्याची दखल घेऊन त्यांना त्या श्रेणीत पुरस्कार दिला जातो.
अलीकडेच अकोला औद्योगिक वसाहतीत कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून खाद्यान्न तयार करण्याचा प्रकल्प राठी पेढेवाला यांनी सुरू केला. शासनाच्या मानकांचे काटेकोर पालन करून, दर्जेदार खाद्यान्न सामुग्रीचा वापर आणि नैसर्गिक चव व माफक किंमत यांची अचूक सांगड घालून ठेवून या प्रकल्पात विविध चवीच्या खाद्यान्न उत्पादन तयार केले जाते. आज बघता बघता महाराष्ट्रासह इतरही राज्यात या उत्पादनांची मागणी होत आहे. एवढेच नव्हे तर निर्यातीसाठीचे सर्व निकषांची पूर्तता करून, विदेशात हे उत्पादन पाठवले जात आहे. अकोला शहरातील जुने शहर भागातील प्राचीन काळा मारोती मंदिर परिसरात राहणारे राठी कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. आज जे व्यावसायीक साम्राज्य पसरले आहे. त्यांची मुहूर्तमेढ ही पेढे आणि पापडी,शेव फरसाण घरीच तयार करून, जुने कॉटन मार्केट समोर चारचाकी गाडीवर विक्री करण्यापासून झाली.
प्रचंड मेहनत आणि क्वालिटीत मुळीच तडजोड नाही. या बळावर हळूहळू हा व्यवसाय जसजसा वाढत गेला तसतसे दर्जेदार सामुग्रीचा वापर करून उत्तम चवीचे इतरही खाद्यपदार्थ तयार करु लागले. आजही राठीचा पेढा आणि समोसा खवैय्यांची पहिली पसंद! यासोबतच राठी कॅटरिंग अग्रस्थानी आहे. आज या पुरस्काराने राठी कुटुंबाच्या परिश्रमाचे चीज झाले. पहिल्यांदा काही लिहीतांना शब्द थिटे होऊ लागले आहेत.
अकोला दिव्य परिवाराकडून राठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मनस्वी शुभेच्छा
