अकोला दिव्य न्यूज : तब्बल 9 वर्षानंतर होत असलेल्या अकोला निवडणुकीसाठी आज गुरुवार 15 जानेवारीला मतदान सुरू होण्याच्या काही तास अगोदर काल बुधवार 14 जानेवारीला रात्री खदान पोलिसांनी ५० लाखाची रोख रक्कम जप्त केली. शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून गोरक्षण रोडवरील विद्या नगर या उच्चभ्रू वसाहतीमधून ही रोकड जप्त केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अकोला महापालिका निवडणुकीच्या दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगण्याचे कारण काय? याचा तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईची माहिती महापालिका निवडणूक विभाग व प्राप्तिकर विभागाला देण्यात आली. मतदानाच्या पूर्वी घडलेल्या या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली.

अकोला महापालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे. महापालिकेच्या २० प्रभागांतील ८० जागांसाठी ४६९ उमेदवार मैदानात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी विविध प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. अनेक ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढतीची रंगत आहे. महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांचे पाठबळ मिळण्यासाठी उमेदवारांकडून अतोनात प्रयत्न केले. आज गुरुवार १५ जानेवारीला शहरातील ६३० मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे (बातमी वाचताना). या मतदानाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच शहरात एक मोठी घडामोड घडली.

निवडणुका म्हटले की पैसे वाटपाचा आरोप होतोच. महापालिका निवडणुकीत तर त्याचे प्रमाण जास्त असते, असे बोलल्या जाते. दरम्यान, अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात रोकड आणली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून खदान पोलिसांनी सापळा रचत ५० लाख रुपयांची रोख रक्कम बुधवारी रात्री विद्या नगर भागातून जप्त केली आहे. ही रक्कम बाळगणाऱ्या एका व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात ५० लाख रुपयांची रोख रक्कम जवळ ठेवण्याचे कारण काय? याची माहिती पोलीस घेत आहेत. ५० लाख रुपयांच्या रोख रकमेचा वापर महापालिका निवडणुकीसाठी होत आहे का?. ही रक्कम नेमकी कोणाची, त्याचा वापर कशासाठी होणार होता? याचा सविस्तर तपास व चौकशी केली जात आहे. निवडणूक विभाग व प्राप्तिकर विभागाला देखील याची माहिती दिली. तपासानंतर रकमेबाबत नेमके सांगता येईल, असे खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी सांगितले.
“
