अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : पश्चिम विदर्भातील ख्यातनाम नंद गणपती संग्रहालयाचे सर्वेसर्वा प्रदीप नंद (गोटूशेठ) यांनी छंद जोपासत साकारलेल्या अद्वितीय आणि आगळ्यावेगळ्या गणेश मुर्ती संग्रालयासाठी पुणे येथील छंदसम्राट सामाजिक संस्थेतर्फे या वर्षीचा मानाच्या ‘छंदसम्राट’ किताबाने त्यांना गौरविण्यात आले. हा सन्मान सर्व छंदप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरला.

ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेत रसिकांनी भरगच्च सभागृहात कार्यक्रमाच्या प्रारंभी नंद यांचे पारंपरिक पद्धतीने मानाचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले. आणि डॉ. गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.रोख २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र असे या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्व. देवदत्त अनगळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमधील तारांगण ऑडिटोरियम येथे पार पडलेल्या कार्यक्रमात नंद यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवडलेल्या ४० गुणवंतांचा त्यांच्या अनोख्या छंदासाठी विशेष सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्रदीप मधुसूदन नंद यांनी कृतज्ञता व्यक्त करत, “हा बहुमान माझ्या एकट्याचा नसून, ज्यांनी-ज्यांनी आपली आवड जोपासली त्या प्रत्येक रसिकमनाचा आहे. मला संग्रहालय उभारण्यास सहकार्य केले त्यांचा हा सन्मान आहे. सर्वांनी आवर्जून आमचे गणपती संग्रहालय पाहण्यासाठी यावे, असे निमंत्रण दिले.
यावेळी संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. माधव देशमुख यांनी आपल्या ओघवत्या मनोगतात संस्थेचे अध्यक्ष दिलीप डाहाके यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. ‘छंद जोपासणाऱ्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा आणि त्यांना नवी प्रेरणा मिळावी, यासाठी हा उपक्रम अत्यंत मोलाचा आहे. पुढील वर्षी हा सोहळा चिखलदरा येथील गणपती संग्रहालयात आयोजित करावा, नंद त्यासाठी सर्वोत्तम व्यवस्था करतील’ अशी घोषणा डॉ. देशमुख यांनी केली.

या सोहळ्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (पिंपरी-चिंचवड शाखा) अध्यक्ष भाऊसाहेब भोईर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. तसेच, विशेष निमंत्रित म्हणून पीसीएमसी सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रविण तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खामप्रिया, प्रसिद्ध ऑर्गन वादक राजीव परांजपे, राजीवजी क्षीरसागर, युवा उद्योजक तेजस शिंदे, साहित्यिक राजन लाखे, अनिल बडगुजर, सूर्यकांत सोनार, हिंदुत्व रत्न डॉ. रवींद्र भोळे आणि समाजसेवक संभाजी बारणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नंद यांचे मित्र राज पाटील, राजू गाडगीळ आणि विकास मैत्र उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र विमल श्रीमंत सगर व संग्राम पाटील यांनी केले.आयोजनाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष दिलीप डाहाके, उपाध्यक्ष संतोष काळे, सचिव दिपक पाटील, कोषाध्यक्ष अश्विनी पाटील आणि कार्यवाह प्रतिक अलिबागकर यांनी विशेष परिश्रम घेतले.