राष्ट्रीय स्तरावर विमा क्षेत्रात विशाल गोपालदास कलंत्री राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    0
    2

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार अकोल्याचे विशाल गोपालदास कलंत्री यांना सलग दुसऱ्या वर्षी लोणावळा येथील डेला रिसॉर्टमध्ये एका समारंभात इफको टोकियो जनरल इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक मिलन संघवी व उपाध्यक्ष पंकज धीमन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    देशभरातील ४० हजारांहून अधिक विमा सल्लागारांच्या विशाल जाळ्यामध्ये सर्वसाधारण विमा व्यवसायात अकोला जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. ग्राहकांना सातत्याने दर्जेदार सेवा देणे, व्यावसायिक उत्कृष्टता जपणे आणि विमा क्षेत्रात सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी करणे यामुळे त्यांच्या या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.विमा क्षेत्रात विशेषतः विमा दाव्यांच्या निपटाऱ्याबाबत कलंत्री यांना सखोल अनुभव व विशेष प्राविण्य प्राप्त आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या विमा दाव्यांचे निपटारे करण्यातील त्यांची कार्यक्षमता, अनुभव व कौशल्याने त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे. ग्राहकांप्रती बांधिलकी, उत्कृष्ट सेवा, दाव्यांच्या निपटाऱ्यात विशेष प्राविण्य आणि सातत्यपूर्ण कामगिरी त्यांच्या यशाची प्रमुख कारण आहेत.

    उल्लेखनीय बाब म्हणजे, कलंत्री कुटुंब गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून विमा क्षेत्रात कार्यरत असून, या कालावधीत त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान त्यांच्या मेहनतीची, विश्वासार्हतेची आणि व्यावसायिक गुणवत्तेची पावती मानला जात आहे. ‌या पुरस्कारामुळे केवळ कलंत्री कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण अकोला शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशाल कलंत्री यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विमा क्षेत्रासह विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!