अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : संपूर्ण भारतवासी आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय सण साजरा करताना, अकोला शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुण पिढीला नैतिकतेने वैद्यकीय व्यवसाय करून आर्थिक विकास व प्रतिष्ठा कशी मिळवायची याचं एक उत्तुंग उदाहरण असणारे, पथदर्शी व्यक्तीमत्व व समाजशील धन्वंतरी व पश्चिम विदर्भातील नेत्रदान चळवळीचे प्रणेते डॉ. चंद्रकांत पनपालिया देखील आजच आपल्या वैद्यकीय सेवेचा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. अधिक महत्त्वाचे की, उद्या १५ ऑगस्टला डॉ.पनपालियांनी सुरू केलेल्या नेत्रदान चळवळीला ३९ वर्ष व यासाठी उभारण्यात आलेल्या नेत्रकमलांजली रूग्णालयाला २७ वर्षे पुर्ण होत आहे. हा अकोला व पंचक्रोशीतील वैद्यकीय क्षेत्रातील एक त्रिवेणी संगमच म्हणावा लागेल ना !

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाला सर्वोच्चस्थानी राखून जीवनाच्या प्रवासात प्रत्येक नवीन कार्याची सुरुवात १५ ऑगस्टपासून करणारे डॉ.पनपालियांना आज कुठल्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही आणि हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा आणि सौभाग्याचा दिवस आहे.अकोला शहरात ५० वर्षे निष्ठेने आरोग्यसेवा, रुग्णांची अमूल्य सेवा आणि मानवता धर्माचे पालन करत त्यांनी एक आदर्श आणि प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. सुवर्ण महोत्सवी प्रवास म्हणजेच अविरतपणे तब्बल पाच दशकांची रूग्ण सेवा आहे.
१५ ऑगस्ट १९७६ ते १५ ऑगस्ट २०२६ हा ५० वर्षांचा मोठा काळ त्यांनी अकोला येथील जनतेच्या सेवेसाठी समर्पित केला.रुग्णसेवा हाच धर्म मानून मनोभावे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात केवळ व्यवसाय न पाहता संकटातील आणि तळागाळातील रुग्णांना नेहमीच दिलासा दिला. विश्वास आणि आपुलकी निर्माण केल्यानेच अकोल्यातील पिढ्यानपिढ्या रुग्णांचे त्यांच्यावर अपार प्रेम व विश्वास राहिला आहे.आणि राहणारच आहे.सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील गरीब व अजाण लोकांच्या वैद्यकीय उपचार व सेवेत कधीही पैसा आड येऊ दिला नाही.एवढेच नव्हे तर याकामी यथोचित योगदान दिले आहे. अनेकदा मोफत आरोग्य आणि तपासणी शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक व नेत्रदान चळवळीसारख्या उपक्रमांना त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.एक आदर्श जीवनशैली आत्मसात करून वैद्यकीय व्यवसायाला सन्मान मिळवून देणारे डॉ.पनपालिया आजच्या वैद्यकीय व्यावसायिकांसाठी त्यांनी ५० वर्षांचा अखंड प्रवास एक दीपस्तंभ आहे.

५० वर्षांच्या या खडतर पण यशस्वी प्रवासात डॉ. पनपालिया यांनी हजारो रुग्णांना बरे करत निरोगी आयुष्य दिले. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी आलेला हा सुवर्णयोग अकोला शहराच्या वैद्यकीय व सामाजिक वर्तुळात अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन पिढीसाठी श्रद्धास्थान आणि समाजशील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत यांनी वैद्यकीय सेवेची अर्ध्या शतकाच्या या कालखंडात निस्सीम सेवाभावाने हजारो रुग्णांचे आयुष्यनियमन केले असून ५० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी केवळ व्यवसाय केला नाही, तर मानवतेची सेवा केली.

रुग्णांच्या केवळ शारीरिक व्याधीच नव्हे, तर मानसिक वेदना समजून घेणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे.अकोल्यातील पिढ्यानपिढ्यांच्या अनेक कुटुंबांचे ते फॅमिली डॉक्टर राहिले आहेत.आरोग्य व सामाजिक योगदान अविस्मरणीय आहे. वैद्यकीय ज्ञानाचा वापर सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केला.विविध मोफत आरोग्य सेवा देताना पश्चिम विदर्भात मरणोत्तर नेत्रदान चळवळीचे प्रणेते ठरले आहेत. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतदेहाचे डोळे काढणे आज सहज शक्य असले तरी डॉक्टर पनपालिया यांनी ही संकल्पना अशा काळात सुरू केली. ज्या काळात समाजमन याला मृतदेहाची विटंबनाच मानत असे. वाळूच्या कणातून तेल काढण्यासारखे हे काम होते. पण खचून जाणार ते चंद्रकांत नाही !

डॉ. चंद्रकांत पनपालिया यांनी एक व्रत म्हणून निस्वार्थपणे नेत्रदान करण्यासाठी जनजागृती केली. आज त्यांच्या परिश्रमाने ही जनजागृती एक चळवळ म्हणून राबविण्यात येत आहे.आज शेकडो समाजजण या मानविय कामात, स्वयंस्फूर्त सहभागी होत आहेत. या चळवळीने तरुण वैद्यकीय व्यावसायिकांसमोर निस्वार्थ सेवेचा एक वस्तुपाठ ठेवला आहे.अकोला शहरात वैद्यकीय क्षेत्राला एक मानवी चेहरा देण्याचे काम डॉ. पनपालिया यांनी केले असून ५० वर्षांची ही तपश्चर्या म्हणजे निष्ठा, संयम आणि करुणा यांचा संगम आहे. डॉ. पनपालिया यांची ही सुवर्णमहोत्सवी कामगिरी भावी पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल.यामध्ये तसूभरही नाही. लोकांच्या आरोग्याशी निगडित बाबींवर सर्वस्व देणारे डॉ.पनपालियांसाठी सर्व सामान्यांच्या मनातील भावना कदाचित एका गझलेतील ओळीने सांगायचे म्हटले तर मैं युही गुज़ार देता शबे ग़म, संभल संभल के, तुम्हें क्या मिला बताओं मेरी ज़िंदगी बदल के…..……………