Homeस्वर्गीय प्राचार्य गजानन चौधरी यांच्या स्वप्नपूर्तीचा सुवर्णक्षण

स्वर्गीय प्राचार्य गजानन चौधरी यांच्या स्वप्नपूर्तीचा सुवर्णक्षण

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मार्च-२६ मधे घेण्यात आलेल्या ड्रग इन्स्पेक्टर पदाच्या स्पर्धा परीक्षेत आदित्य चौधरी याने घवघवीत यश संपादन केले. सर्वांचा लाडका मित्र, स्वर्गीय प्राचार्य गजानन चौधरी यांनी अंतिम श्वासापर्यंत पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले.आजचा दिवस या यशामुळे आनंदाचा, अभिमानाचा आणि तितकाच भावुक करणारा ठरला आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे क्रीडा (Sports) कोट्यातून तो राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. अवघ्या २५ व्या वर्षी गॅझेटेड ऑफिसर म्हणून त्याची ड्रग इंस्पेक्टर होणारी नियुक्ती ही त्याच्या अथक परिश्रमाची आणि जिद्दीची पावती आहे.

आदित्य हा अत्यंत अभ्यासू, ध्येयवेडा आणि एकाग्र स्वभावाचा विद्यार्थी होता. B.Pharm चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सीओईपी मधून त्याने एमबीए केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक मार्गांचा अनुभव घेतला शेवटी स्वतःच्या परिश्रमवर विश्वास ठेवून स्वअभ्यासाच्या बळावर हे दैदिप्यमान यश मिळवले. मुलाखतीत ही त्याने उत्कृष्ट गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली.

आदित्यचा संपूर्ण प्रवास आज डोळ्यांसमोर उभा राहतो. लहानपणापासूनच आर्चरी खेळाडू होता.आर्चरी या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्याची ओळखला होती. त्याच्या या प्रवासात स्वर्गीय गजानन चौधरी यांनी योग्य मार्गदर्शन, आवश्यक सुविधा आणि उत्तम संस्कार दिले. मुलामध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि मेहनतीची सवय त्यांनीच रुजवली. स्व.गजानन यांच्या अकाली निधनाच्या वेळी आदित्य शिक्षणासाठी बाहेर होता. वडिलांच्या जाण्याचे दुःख मनात असतानाही त्याने खचून न जाता त्यांच्या स्वप्नपूर्तीलाच आपले ध्येय मानले. संपूर्ण ताकदीने अभ्यास करून हे यश मिळवले.

या संपूर्ण प्रवासात त्यांची आई अर्चना चौधरी यांनी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहत त्याला प्रत्येक टप्प्यावर आधार दिला. याच दरम्यान स्व गजाननच्या आईचे निधन झाले होते, परंतु वहिनी आपल्या मुलासाठी हिरकनी सारख्या उभ्या राहिल्या. त्यांचा त्याग, संयम आणि विश्वासाला हे यश तितकेच समर्पित आहे.

आदित्य केवळ परीक्षा उत्तीर्ण झाला नाहीस, तर त्याने त्याच्या बाबांनी आयुष्यभर जपलेले स्वप्न साकार केले आहेस. आज स्व गजानन आपल्यात असता तर त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहिले असते. परंतु आम्हाला खात्री आहे की, तो जिथे कुठे असेल, तिथून आपल्या मुलाकडे अभिमानाने पाहत असेल.

मित्रा गजानना, काळजी करू नकोस तुझा मुलगा खंबीर आहे, सक्षम आहे आणि तुझ्या संस्कारांचा खरा वारसदार आहे. आम्ही सर्व मित्रमंडळी आजही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.अशा शब्दात स्व.गजानन चौधरी यांचे जीवाभावाचे मित्र आपल्या भावना व्यक्त करीत आहेत

आदित्य, तुझ्या या अभूतपूर्व यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! तुझ्या भावी सेवाकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. तुझ्या हातून समाजसेवेचे, प्रामाणिक प्रशासनाचे आणि जनहिताचे अनेक आदर्श निर्माण होवोत, ईश्वरचरणी हीच प्रार्थना अशा भावना व्यक्त करताना चौधरी यांच्या मित्रांना गहिवरून आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular