Sunday, June 14, 2026
No menu items!
No menu items!
Homeमालेगाव हादरलं ! एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

मालेगाव हादरलं ! एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

पतीचा मृतदेह टॉवरला लटकलेल्या अवस्थेत, तर पत्नी व दोन चिमुरड्यांचे मृतदेह विहिरीत सापडले. अकोला दिव्य न्यूज : वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील तिवळी गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री समोर आला. पतीचा मृतदेह विजेच्या टॉवरला लटकलेल्या अवस्थेत, तर पत्नी व मुलांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून मुलांना विहिरीत ढकलून स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

नेमकी घटना काय?
वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या तिवळी गावातून एक अत्यंत दुर्दैवी खळबळजनक घटना समोर आली. एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या दोन निष्पाप लहान मुलांचे मृतदेह शेतात आढळून आले. तिवळी येथील बकाल यांच्या स्वतःच्या शेतात हे मृतदेह आढळून आले आहेत. संतोष तुकाराम बकाल (वय ३८) यांचा मृतदेह शेतातील विजेच्या टॉवरला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. वर्षा संतोष बकाल (वय ३४) यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. जान्हवी संतोष बकाल (वय ७) व सोहम संतोष बकाल (वय ६) या चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीत हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.

पोलिसांचा सर्व बाजूंनी तपास
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून व टॉवरवरून मृतदेह काढले. शिरपूर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शिरपूर जैन पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करीत आहे. या घटनेमुळे तिवळी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शेतात हळद लागवडीसाठी गेले, पण…
संतोष बकाल यांच्यासह त्यांचे कुटुंब शनिवारी दुपारच्या सुमारास शेतात हळद लागवडीच्या कामासाठी गेले होते. मात्र, काम अर्धवट अवस्थेतच होते. कुटुंबात कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याचा अंदाज लावला जात आहे. त्यातून संतोष बकाल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे. शेताजवळील विहिरीत पत्नी आणि मुलांचे मृतदेह आढळून आले तर उच्च दाब क्षमतेच्या विजेच्या टॉवरला गळफास घेऊन पतीने जीवनयात्रा संपवल्याचे दिसून येते. पोलीस तपासात या घटनेमागील नेमके वास्तव समोर येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!