
अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रात शिवसेनेचे वर्चस्व वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असताना अनेक जिल्ह्यांमध्ये आपसी हेवेदावे, वादविवाद आणि वर्चस्वाच्या लढाईत पक्ष वाढीस खिळ बसली आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांसोबतच अकोला जिल्हा शिवसेनेची (शिंदे गट) कार्यकारिणी आज गुरूवार १४ एप्रिल रोजी बरखास्त करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरीने १२ एप्रिल २०२६ रोजी अकोला जिल्हा शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली असल्याचे जाहीर केले गेले आहे.
अकोला जिल्हा शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात येणार आहे. अशी चर्चा एप्रिल २०२६ च्या मध्यास सुरू झाली.जेव्हा अकोल्यात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा पासून कार्यकारिणी बरखास्तीची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेत वाढता अंतर्गत वाद, शिवसेना आणि भाजप यांच्यात अकोला महानगरपालिकेत अंतर्गत वाद उघडकीस आले असून, यातूनच ही राजकीय हालचाल आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘भाकरी फिरवण्याच्या’ (नेतृत्वात बदल) तयारीला लागले असल्याचे समजते, ज्यामुळे जुनी कार्यकारिणी बरखास्त केली आणि नवीन नियुक्त्यासाठी जुजबी माहिती गोळा केली जाते आहे.

शिंदे गटातील अंतर्गत बदलाआधी, उद्धव ठाकरे गटाचे काही नगरसेवक व कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाल्याने अकोल्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. अकोल्यातील राजकारणात सध्या शिंदे गटाचे वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यासाठी जुनी कार्यकारिणी बदलून नवीन टीम आणली जाण्याची शक्यता आहे.अशी माहिती समोर आली आहे.शिवसेनेचे अकोल्यातील काही नेते बोलाचा भात आणि बोलाची कडी आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर स्वतःला मिरवून घेत आपला स्वार्थ साधत असून विधानसभा निवडणूकीत आणि नुकत्याच झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत लाखो रुपये हडप करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुराव्यानिशी दिली गेली आणि या नेत्यांना पक्ष वाढीसाठी काही देणेघेणे नाही. पाणी डोक्यावरून जात असल्याने अशा नेत्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल, अशी चर्चा सुरू आहे.
