अकोला दिव्य न्यूज : आज मे महिन्याच्या पहिल्याच दिवशीच महागाईचा मोठा भडका उडाला असून बंगाल, तामिळनाडूसह पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका संपताच देशात महागाईला सुरुवात झाली आहे. इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे गॅस पुरवठ्यावर झालेल्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी १ मे पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबईसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत थेट ३ हजारांच्या वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र सध्यातरी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांच्या आकड्यांवर नजर टाकल्यास व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. दिल्लीसारख्या महानगरांमध्ये गॅस सिलेंडरची किंमत सुमारे १ हजार रुपयांनी वाढली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत झालेल्या वाढीचा फटका हा लगीनसराईच्या काळात सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणही आणखीनच महागण्याची शक्यता आहे.

वेगवेगळ्या शहरांत अशी आहे सिलेंडरची किंमत आज झालेल्या वाढीमुळे देशभरात १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत पहिल्यांदाच तीन हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत २०३१ रुपयांवरून वाढून थेट ३०२४ रुपयांवर पोहोचली आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरसाठी ३ हजार ७१.५० रुपये मोजावे लागणार आहेत. नुकतंच मतदान आटोपलेल्या पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत २ हजार २०८ रुपयांवरून वाढून थेट ३ हजार २०२ रुपयांवर पोहोचली आहे. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत ३ हजार २३७ रुपयांवर पोहोचली आहे.
