अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिकेच्या सत्तेत सहभागी असलेल्या मित्र पक्षातील भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल व शिवसेनेचे नगरसेवक सागर भारूका यांच्यात स्थायी समितीच्या सभेत मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्यावरुन चांगलीच खडाजंगी झाली. केवळ शाब्दिक वाद नाही तर शिवीगाळ करून एकमेकांवर धावून जाण्या पर्यंत पोचला. अखेर सभापती अग्रवाल यांनी भारुका यांना सभेपुरते निलंबीत करुन त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. भारुका सुरक्षा रक्षकांना देत नसल्याने सभागृहनेते पवन महल्ले यांनी सभागृहात येवून भारुका यांना सभागृहाच्या बाहेर नेले.

स्थायी समितीच्या काल पार पडलेल्या सभेत मागील सभांच्या इतिवृत्तांना मंजुरी देणे हा विषय होता. मागील सभेत सागर भारुका यांनी सभागृहातून वॉक आऊट केले होते. त्यामुळे सभागृहात त्यांना चर्चा करता आली नाही. त्यामुळे इतिवृत्त वाचन करताना तसेच त्याला मंजुरी देण्यापूर्वी मला बोलू द्या, अशी भूमिका भारुका यांनी घेतली. मात्र नियमानुसार इतिवृत्तावर चर्चा करता येत नाही. केवळ वाचन करुन त्यास मंजुरी द्यावी लागते, ही बाब सभापती विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केली.
मात्र सभापतींची ही सुचना धुडकावून लावत मला तुम्ही असे कसे, बोलू देत नाही. तुम्ही नेहमीच दादागिरी करता, ही दादागिरी चालणार नाही. मी याचा निषेध करतो, असे बोलताना अभद्र भाषेचा वापर केला. यामुळे सभापती अग्रवाल संतप्त झाले. भारुका बोलत असलेले शब्द मिनिटमध्ये घेवू नका, असा आदेश दिला. यावरुन भारुका आणखी खवळले. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना चॅलेज दिले. एवढेच नव्हे तर दोघांच्या मधात अंतर असताना एकमेकांवर दोघेही धावून आले. मात्र एकमेकांपर्यंत पोहचले नाही.

अखेर सभापती अग्रवाल यांनी त्यांचे एका सभेचे निलंबन करुन त्यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. यामुळे सागर भारुका अधिक भडकले. मला कोण बाहेर काढतो, हे मी बघतोच, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षक सभागृहात आले. मात्र त्यांना ते जुमानत नसल्याचे पाहून सभागृहनेता पवन महल्ले सभागृहात पोहचले आणि त्यांनी सागर भारुका यांना बाहेर काढले. स्थायी समितीत झालेल्या या प्रकाराचे व्हिडीओ व्हायरल झाले. यामुळे शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान सभेत मागील सभांच्या इतिवृत्तांना मंजुरी दिली.मनपाच्या शाळांमध्ये डिजिटल बोर्ड खरेदीसाठी प्राप्त निविदाधारकांसोबत करारनामा करण्यास मान्यता, लोकसेवा हक्क अधिनियमानुसार एकुण ६५ ऑनलाईन करणे करीता त्रयस्थयंत्रणे मार्फत राबविण्यास निविदाधारकासोबत करारनामा करण्यास मंजुरी देण्यात आली.
