अकोला दिव्य न्यूज : अकोला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अकोट फाईल भागात शुक्रवारी रात्री घडली. शरद श्रीराम तुरकर असे हल्ला झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. या भागात तोडफोड देखील झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली. जखमी नगरसेवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

अकोला महापालिकेच्या २० प्रभागातील ८० जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत शहरातील अनेक प्रभागांमध्ये अत्यंत काट्याची लढत झाली. त्यापैकीच एक असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये काँग्रेस व भाजपमध्ये अटीतटीचा सामना झाला. या प्रभागात तीन जागा ‘एआयएमआयएम’ पक्षाने जिंकल्या, तर एका जागेवर भाजपने काँग्रेसचा पराभव केला. प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये भाजपचे उमेदवार शरद तुरकर यांनी काँग्रेसचे उमेदवाराचा दोन हजार २०० मतांनी पराभव केला.
या विजयामुळे प्रभागातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. त्यातूनच भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांची अकोट फाईल भागातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रभागात असताना नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेमध्ये शरद तुरकर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून पुढील उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अकोट फाईल परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोड सुद्धा झाली. उभ्या वाहनांचे नुकसान करण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्या होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली. या घटनेचा सखोल तपास केला जात आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. निकाल जाहीर होताच शहरातील वातावरण चांगलेच तापले असून आरोप प्रत्यारोप पुन्हा सुरू झाले.
