Thursday, January 2, 2025
Homeराजकारण'अकोला पूर्व’मध्ये तिरंगी लढत ! भाजपपुढे शिवसेना ठाकरे गट व वंचितचे आव्हान

‘अकोला पूर्व’मध्ये तिरंगी लढत ! भाजपपुढे शिवसेना ठाकरे गट व वंचितचे आव्हान

अकोला दिव्य ऑनलाईन : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला पूर्व मतदारसंघाचे २०१४ पासून रणधीर सावरकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सलग तिसऱ्यांदा पक्षाने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून यंदा पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपपुढे शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीचे तगडं आव्हान राहणार असून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात जातीय राजकारण निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

अकोला पूर्व मतदारसंघ भाजपाने रणधीर सावरकर यांना सलग तिसऱ्यांदा पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तर मविआमध्ये हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढत असून गोपाल दातकर यांना उमेदवारी दिली. वंचित आघाडीने ज्ञानेश्वर सुलताने यांना संधी दिली आहे. भाजप, शिवसेना ठाकरे गट व वंचित आघाडीत तिहेरी सामना होण्याची शक्यता आहे.

वर्ष २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे रणधीर सावरकर यांनी वंचित आघाडीचा २४ हजार ७२३ मतांनी पराभव केला होता. यावेळी अकोला शहर आणि परिसरात भाजपला भरभरून मते मिळाली होती. मात्र त्या प्रमाणात शिवसेना उमेदवाराला शहरातील मतदान अत्यंत कमी प्रमाणात होते. ही बाबच भाजपला दिलासा देणारी आहे.

अकोला पूर्व मतदारसंघात जातीय राजकारण नेहमीच प्रभावी राहिले आहे. मतदारसंघात मराठा, कुणबी, माळी, धनगर, कोळी, दलित, मुस्लीम, तेली, बंजारा व इतर समाजाचे गठ्ठा मतदान आहे. भाजप उमेदवार मराठा पाटील, शिवसेनेचे कुणबी, तर वंचित आघाडीचे धनगर समाजाचे उमेदवार दिले असल्याने जातीनिहाय गठ्ठा मतांची विभागणी होण्याचा दाट अंदाज आहे.

दलित, मुस्लिमांसह इतर छोट्या-मोठ्या समाजाची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरेल. रणधीर सावरकर यांची पक्षावर मजबूत पकड असून मतदारसंघात त्यांनी संघटनात्मकरित्या जाळे निर्माण केले. १० वर्षांतील विकास कामे व व्यापक जनसंपर्क त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकतो. तर शिवसेनेचे गोपाल दातकर व वंचितचे ज्ञानेश्वर सुलताने यांचे राजकारण जिल्हा परिषदेत असले तरी या दोन्ही उमेदवारांच्या समाजाचे गठ्ठा मतदान आणि उध्दव ठाकरे यांच्या बद्दल असलेली सहानुभूती लक्षात घेऊन पक्षांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. युतीमध्ये २०१४ च्या अगोदर शिवसेनाच तत्कालीन बोरगाव मंजू मतदारसंघात लढत होती.मात्र विजय मालोकार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दिलेल्या लक्षणीय लढतीने शिवसेना उमेदवार विजयी होऊ शकले नाही.

१९९५ मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून गुलाबराव गावंडे निवडून आले होते. त्यानंतरच्या चार निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले नाही. २०१४ मध्ये स्वबळावर लढली, त्यावेळी शिवसेना उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३५ हजार ५१४ मते मिळाली होती. विशेष म्हणजे ग्रामीण भागात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती.यंदा दातकर यांच्यापुढे मतांचा टक्का वाढविण्याचे आव्हान राहील.

२००४ पासून अँड प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघात धनगर समाजाला कायम प्रतिनिधित्व दिले. यादरम्यान भारिप-बमसंचे हरिदास भदे २००४ व २००९ मध्ये निवडून देखील आले, तर २०१४ व २०१९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता वंचितने ज्ञानेश्वर सुलताने यांना उमेदवारी दिली. त्यांच्यापुढे वंचितच्या मतपेढीत भर घालण्याचे लक्ष्य असेल. अकोला पूर्वच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!