Thursday, January 2, 2025
Homeताज्या बातम्याचर्चेतील IAS अधिकारी पूजा खेडकर यांची नोकरीच धोक्यात ! प्रकरणात थेट दिल्लीचं...

चर्चेतील IAS अधिकारी पूजा खेडकर यांची नोकरीच धोक्यात ! प्रकरणात थेट दिल्लीचं लक्ष


अकोला दिव्य ऑनलाईन : पुणे येथून वाशिम येथे बदली होऊन आज ११ जुलैला वाशिम जिल्ह्याधिकारी कार्यालयात रूजू झालेल्या व पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या गैरव्यवहारामुळे चर्चेत असणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांची नोकरी धोक्यात आली असल्याचे चिन्ह दिसत आहे.आधी फक्त केबिन, स्वीय सहाय्यक आणि खासगी ऑडी कारवरचा अंबर दिवा इथपर्यंतच मर्यादित असणारा पूजा खेडकर यांचा गैरव्यवहार आता थेट आयएएसमध्ये निवड होण्यासाठी चुकीची कागदपत्र देण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणात थेट पंतप्रधान कार्यालयानं लक्ष घातलं आहे. त्याशिवाय, सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी अर्थात LBSNAA ने देखील पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल महाराष्ट्र सरकारकडे मागितला आहे.

पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला. यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिम येथे बदली करण्यात आली. प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. मात्र, आता फक्त बदलीवर भागणार नसून त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांनी आधी काही प्रमाणात अपंगत्वाच्या श्रेणीत अर्ज केला होता. नंतर पूर्ण अपंग श्रेणीमध्ये त्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला. निवड झाल्यानंतर मात्र यासाठीच्या वैद्यकीय चाचणीसाठी सहा वेळा बोलवूनही त्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांमध्ये दिसून आलेल्या घोळामुळे आता त्यांना नोकरीतून बडतर्फ का करण्यात आलं नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर दिल्लीहून पावलं उचलली जाऊ लागली आहेत.

पूजा खेडकर वाशिमला रूजू झाल्या !
दरम्यान, पूजा खेडकर यांची वाशिमला बदली झाल्यानंतर आज ११ जुलै रोजी रुजू झाल्याचं वृत्त आहे. पण त्यांच्या गैरवर्तनासंदर्भात आता प्रशासकीय विभाग, पंतप्रधान कार्यालय व लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीकडून काय कारवाई केली जाते ? यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

LBSNAA कडूनही कारवाई होण्याची शक्यता?
दरम्यान, कोणत्याही IAS अधिकाऱ्याला निवड झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी येथे एक वर्षाचं प्रशिक्षण आणि पुढे त्यांच्याच देखरेखीखाली संबंधित अधिकाऱ्याला मिळालेल्या काडर राज्यातील ठराविक ठिकाणी एक वर्षाचं प्रत्यक्ष कामावरचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे IAS पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळातील बाबींसंदर्भात या अकादमीनंही लक्ष घातलं आहे. LBSNAA चे उपसंचालक शैलेश नवल यांनी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पूजा खेडकर यांच्यासंदर्भातला अहवाल मागितला आहे. यासंदर्भात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या सहीनिशी हा अहवाल पाठवण्याचंही अकादमीनं नमूद केल्याचं हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!