अकोला दिव्य न्यूज : अल्पवयीन भाचीवर चुलत मामाची वाईट नजर पडली. त्या नराधम मामाने आपल्या भाचीवरच लैंगिक अत्याचार केले. अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. नात्याला काळिमा फासणारा या धक्कादायक घटने प्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन भाचीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या चुलत मामाला १० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. वि. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास नराधम मामाला भोगावा लागणार आहे.

आपल्या स्वतःच्या घरात देखील अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे चित्र सध्या समाजात निर्माण झाले आहे. नातेवाईकांचीच मुलींवर वाईट नजर राहत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार आतापर्यंत राज्यात उघडकीस आले. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनांमुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारच्या घटना घडू नये म्हणून वेळीच सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली.
अकोला जिल्ह्यातील एका घटनेत चुलत मामानेच आपल्या भाचीवर अतिप्रसंग केल्याचा संताप जनक प्रकार घडला होता. अल्पवयीन पीडिता कौटुंबिक वादामुळे वडिलांपासून विभक्त राहणाऱ्या आईसह आजी-आजोबा आणि चुलत मामासोबत राहत होती. त्या काळात आरोपीने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास स्वतःला विहिरीत झोकून देईन, तसेच तुझ्या कुटुंबावर खोटे आरोप करेल, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली.
त्यानंतर पीडितेची प्रकृती बिघडल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या सांगण्यावरून पीडितेने घडलेली घटना आईला सांगितली आणि तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. तपास अधिकारी पातोंड व उकंडा जाधव यांनीही मोलाचे योगदान दिले. एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले असून, न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरून शिक्षा ठोठावली.
पीडितेने दिला मुलीला जन्म
या घटनेतून पीडितेने एका मुलीला जन्म दिला. पुढील तपासात पीडिता, आरोपी आणि नवजात बालिकेचे रक्तनमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. अहवालात बालिकेचा जैविक पिता आरोपीच असल्याचे सिद्ध झाले. या सर्व बाबी सरकारी पक्षाच्यावतीने न्यायालयाच्या समोर मांडण्यात आल्या आहेत.