गजानन सोमाणी : अकोला दिव्य न्यूज : राजस्थानी समाजाचे आराध्य दैवत खाटू श्याम यांचा सुप्रसिद्ध वार्षिक लक्खी मेळा अर्थात फाल्गुनी उत्सव 28 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून पुढील 12 दिवसांपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होऊन श्याम बाबांच्या नावाचा गजर करून मोठ्या उत्साहात फाल्गुनी उत्सव साजरा करतात. खाटु नरेश श्याम बाबा यांचा हा मेळा राजस्थानचा सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. मनातून येथे जाण्याची इच्छा असूनही काही कारणांमुळे काही भाविक भक्त जाऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन अकोला येथे तृतीय श्री श्याम फाल्गुनी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

राजस्थान येथील हा मेळा आस्था, भक्ति आणि प्रेम यांचा संगम असून, राजस्थानी लोकगीत आणि राजस्थानी संगीत या माध्यमातून अकोला शहरातील श्याम बाबा भक्त आणि भाविकांना या संगमात न्हावून निघण्यासाठी उद्या मंगळवार ४ मार्चला अकोला-बाळापुर महामार्गावरील टाटा शोरुम कॅम्पस ‘स्टेटस लॉन’ पारसकर इस्टेट येथे रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राजस्थान, जयपूर येथील ख्यातनाम लोकगीत व भजन गायक आणि खाटू श्याम बाबा यांचे परमभक्त चैतन्य दाधीच आणि गुडगाव येथील भजन गायीका वर्षा गर्ग यांच्या भजन, लोकगीत आणि लोक संगीताची मेजवानी मिळणार आहे. यासोबतच ८ चंग आणि बासरी वादक यात धमाल उडवून देणार आहे. शहरातील उद्योजक विवेक पारसकर यांच्या भरीव सहकार्याने अकोला येथील ‘श्याम के दिवाने’ ग्रुपने हे आयोजन केले आहे.

अकोला शहरात पहिल्यांदाच राजस्थान येथील गायक-वादक आणि चंग वादन, नृत्य आणि राजस्थानी संगीताची ही मेजवानी फाल्गुनी उत्सवाला चिरस्मरणीय करणारी ठरेल. तर येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमानंतर येथे महाप्रसाद (भोजन) देखील ठेवण्यात आले आहे. श्याम भक्त आणि भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विवेक पारसकर आणि आयोजक श्याम के दिवाने यांनी केले आहे.

