अकोला दिव्य न्यूज : प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी गेलेली महिला बेपत्ता झाल्याने तसेच तिच्यासोबत गेलेल्या महिलेसोबत देखील मोबाईलद्वारे संपर्क होत नसल्याने या महिलेचा परिवार हवालदिल झाला आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासन प्रयागराज येथील यंत्रणेच्या संपर्कात आहे.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी उषाबाई लक्ष्मण बोरले असे कुंभ मेळ्यातून बेपत्ता झालेल्या वृद्ध भाविक महिलेचे नाव आहे. ही महिला प्रयागराज येथे कुंभमेळ्यात यमुनाबाई भालेराव या अन्य महिलेसह गेली होती. प्राथमिक अंदाजानुसार मौनी अमावास्येच्या पर्वणीवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर बेपत्ता झाल्याचा अंदाज आहे.
उषाबाई बोरलेला मोबाईलवर तसेच सोबतच्या यमुनाबाई भालेराव यांच्या मोबाईलवर संपर्क होत नसल्याने बोरले परिवार हवालदिल झाला आहे. या बेपत्ता महिलेचा मुलगा संतोष बोरले याने आपला भाऊ आकाश बोरले याच्यासह मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांची गुरुवारी, ३० जानेवारी रोजी रात्री उशिरा भेट घेऊन ही माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. जिल्हाधिकारी किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार हे प्रयागराज कुंभमेळ्यातील यंत्रणेच्या संपर्कात आहेत.
• जिल्ह्यातील नागरिकांसाठी हेल्पलाईन : दरम्यान उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या कुंभमेळ्यातील आपत्कालीन स्थितीत प्रयागराज कंट्रोल रुम टोल फ्री क्रमांक १९२०, दुरध्वनी क्रमांक ०५२२-२२३७५१५ उपलब्ध केला आहे. तसेच मंत्रालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले असून त्याचा संपर्क क्रमांक ०२२-२२०२७९९० असा आहे. जिल्हा पोलीस नियत्रंण कक्षाने. ०७२६२-२४२४०० तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२६८२३ हा उपलब्ध केला आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.