Sunday, December 22, 2024
HomeUncategorizedभाजपसाठी ‘फेव्हरेबल’ ! फडणवीस इलेक्शन मोडवर ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे...

भाजपसाठी ‘फेव्हरेबल’ ! फडणवीस इलेक्शन मोडवर ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे संकेत

अकोला दिव्य न्युज : भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे गत पावणेतीन वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणुका रखडल्या असून, राजकीय पक्षांना २२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात ४ जानेवारी रोजीच सुनावणी होण्याची शक्यता असून, तीन महिन्यांत निवडणुका व्हायला हव्यात, असा प्रयत्न असल्याचे वक्तव्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबत संकेतच दिले आहेत.

नागपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी ‘मन की बात’ मांडली. विधानसभेतील विजयामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि भाजपसाठी ‘फेव्हरेबल’ वातावरण आहे. त्यामुळेच याचा फायदा उचलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाचे पक्षाकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. यादृष्टीनेच नवनियुक्त मंत्री, आमदार यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होेते. विधानसभेतील विजयामुळे सरकार, लोकप्रतिनिधी व पक्षावरील जबाबदारी वाढली आहे. सर्वांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. सरकार व जनतेदरम्यान संघटनेमार्फत समन्वय राहावा असा भर राहणार आहे. तिघांमध्ये योग्य समन्वय असला तर काय होऊ शकते हे विधानसभेतील निकालातून समोर आले आहे. भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीत अक्षरश: जादूगारच झाले होते, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. 

लोकप्रतिनिधींचे अप्रत्यक्षपणे टोचले कान

यावेळी फडणवीस यांनी त्यांच्या शैलीत अप्रत्यक्षपणे लोकप्रतिनिधी व पक्षातील पदाधिकाऱ्यांचे देखील कान टोचले. पक्ष संघटनेत केवळ ठरावीक कार्यकर्ते, जिल्हे यांचाच पुढाकार दिसता कामा नये. पदाधिकारी, नेत्यांनी भाषणवीर होण्यापेक्षा कार्यवीर व्हावे ही अपेक्षा आहे. अधिवेशनाच्या सहा दिवसांत जे भेटायला आले त्यातील ९५ टक्के कार्यकर्त्यांना केवळ फोटो काढायचे होते. मात्र, आता कामावर भर द्या. जेव्हा सत्ता असते तेव्हा लोकप्रतिनिधी व संघटनेत अंतर येते. संघटना हे आपले शस्त्र असून, ते धारदारच असले पाहिजे. त्यामुळे संघटनेशी योग्य समन्वय असलाच पाहिजे. तर संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी देखील आम्ही म्हणू तसेच लोकप्रतिनिधींना वागले पाहिजे, असा आग्रह ठेवू नये.त्यांचादेखील सन्मान ठेवला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवायचा असेल तर काही दिवसांत सदस्यता नोंदणीवर भर द्यावाच लागेल. राज्यात दीड कोटी सदस्यता नोंंदणी व्हायला हवी. प्रत्येक बूथवर दीडशे सदस्यांच्या नोंदणीचे टार्गेट असायला हवे. ५ जानेवारी रोजी सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते जनतेत गेले व ५० जणांची नोंदणी केली तर ५० लाखांचा टप्पा काही तासांत गाठला जाऊ शकतो, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उतरून जनतेत गेले पाहिजे. केवळ भाषणे देऊन दुसऱ्यांवर काम ढकलण्याचे प्रकार करू नका, असे फडणवीस यांनी यावेळी बजावले.

मंचावर विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, राष्ट्रीय सहसंगठन महासचिव शिवप्रकाश, सचिव अरविंद मेनन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, ॲड. धर्मपाल मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!