अकोला दिव्य न्युज ब्युरो : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळ्यातील मनी लाँड्रिगप्रकरणी अटक करण्यात आले आहे.आज दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच रात्री ७ वाजताच्या सुमारास १० वे समन्स देण्यासाठी ईडी पथक केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते. समन्स देण्यासाठी पोहचल्यावर ईडी पथकाने छापा टाकून सर्वांचे मोबाईल जप्त केले. यासोबतच केजरीवाल यांच्याकडून डिजीटल डाटा डाऊनलोड करून, प्रश्नोत्तरे सुरू केले आणि ९ वाजताच्या सुमारास केजरीवाल यांना ताब्यात घेत, ईडी कार्यालयात नेले.
या प्रकरणात आतापर्यंत केजरीवालांना ईडीने चौकशीसाठी नऊ समन्स पाठवले, मात्र ते एकदाही हजर झाले नाहीत. यानंतर त्यांनी अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर ही कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला आणि तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. ‘आप’चे नेते भारद्वाज यांना ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले.दरम्यान ‘आप’च्या काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली.