अकोला IMA आणि डॉ. सोमाणी यांचा कार्याचा राज्यस्तरीय MASTACON परिषदेत 2 पुरस्कार प्रदान करून गौरव

    0
    4

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक सेवा देण्यासोबतच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेत सामाजिक ऋणानुबंध जोपासणारे IMA अकोला शाखेच्या कार्याची आणि तत्कालीन अध्यक्षांच्या नेतृत्वाची दखल घेत IMA महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी व डॉ. विक्रांत देसाई यांच्या हस्ते दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

    अकोला दिव्य छायाचित्र सेवा

    नागपुर येथे नुकत्याच पार पडलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित राज्यस्तरीय MASTACON परिषदेत IMA अकोला शाखेला Presidential Appreciation Awards प्रदान करण्यात आले. तसेच IMA अकोलाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. संतोषकुमार सोमाणी यांना 2025-26 या कार्यकाळातील उत्कृष्ट नेतृत्व, समर्पण आणि संघटनात्मक कार्यासाठी Presidential Appreciation Award – Best Leadership या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच IMA अकोला शाखेला उत्कृष्ट सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी Presidential Appreciation Award – Best Big Branch हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    अकोला येथील ज्येष्ठ लॅप्रोस्कोपिक सर्जन, एंडोस्कोपिस्ट आणि सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. संतोषकुमार सोमाणी यांना वैद्यकीय क्षेत्रातील 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. डॉ. सोमाणी सर्जिकल सोसायटीचे माजी अध्यक्ष, ICON हॉस्पिटलचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर व सध्या चेअरमन तसेच देवकीबाई सोमाणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक मोतियाबिंद शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांमध्येही त्यांना विशेष रुची आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली IMA अकोलाने 2025-26 या वर्षात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली.

    अकोला दिव्य छायाचित्र सेवा

    या वर्षातील विशेष आकर्षण म्हणजे ‘ IMA अकोला–महाराष्ट्राची गौरवगाथा ’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम. या कार्यक्रमात तब्बल 65 डॉक्टरांनी सहभाग नोंदवून आपली कला आणि सांघिक एकात्मतेचे दर्शन घडविले. गणेश विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशांच्या सहभागातून डॉक्टरांच्या उत्साहपूर्ण सांस्कृतिक एकजुटीचे दर्शन घडले. विविध वैद्यकीय शाखांचा सहभाग असलेले दर्जेदार CME कार्यक्रम आयोजित करून डॉक्टरांच्या ज्ञानवृद्धीसाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले.

    क्रीडा आणि आरोग्य जनजागृतीच्या क्षेत्रातही IMA अकोलाने विशेष ठसा उमटविला. डॉ. सोमाणी यांच्या सायकलिंग आणि फिटनेसविषयीच्या आवडीमुळे 2025-26 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने भव्य IMA Cyclothon आयोजित करण्यात आले. फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित IMA Walkathon मध्ये सुमारे 5,000 नागरिकांनी सहभाग घेतला. याशिवाय जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली आयोजित करून तंबाखूमुक्त समाजाचा संदेश देण्यात आला. या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये आरोग्य, व्यायाम आणि फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता.

    ‘AAO GAON CHALE – Adopt One Village’ या महत्त्वाकांक्षी सामाजिक प्रकल्पांतर्गत डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग, पाण्याच्या बाटल्या आदींचे वाटप करण्यात आले. यासोबतच त्या भागातील नागरिकांसाठी मोफत निदान व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांद्वारे गरजू रुग्णांची तपासणी, आजारांचे निदान तसेच आवश्यक शस्त्रक्रिया करून त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यात आला. तसेच IMA अकोला भवनाच्या स्वप्नपूर्तीसाठीही भरीव आर्थिक योगदान देण्यात आले.

    या पुरस्कारांबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. संतोषकुमार सोमाणी म्हणाले की, “हे दोन्ही पुरस्कार माझे वैयक्तिक यश नसून संपूर्ण IMA अकोला परिवाराच्या एकजुटीचे, संघभावनेचे आणि सेवाभावाचे प्रतीक आहेत. या यशामध्ये IMA अकोलाचे माझे सचिव डॉ. प्रदीप अग्रवाल व टीमच्या इतर सदस्यांचे विशेष योगदान राहिले. संपूर्ण वर्षभर त्यांनी घेतलेले अथक परिश्रम, नियोजन, समन्वय आणि दिलेले मोलाचे सहकार्य यामुळेच विविध उपक्रम यशस्वीपणे पार पाडणे शक्य झाले. त्यांच्यासह माझ्या सर्व ज्येष्ठ सदस्यांचे, सहकारी डॉक्टरांचे, मित्रांचे आणि कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याचे मी मनःपूर्वक आभार मानतो. या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या सर्व सहकाऱ्यांना आहे.

    सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत सक्रिय सहभाग नोंदविणारे 2025-26 हे वर्ष IMA अकोलासाठी अत्यंत संस्मरणीय ठरले. या सर्व उपक्रमांचा लाभ अकोला शहरातील नागरिक, वैद्यकीय क्षेत्र आणि समाजातील विविध घटकांना झाला. दोन मानाच्या पुरस्कारांमुळे IMA अकोला शाखेच्या कार्याचा महाराष्ट्र राज्य स्तरावर गौरव झाला असून, संपूर्ण IMA अकोला परिवारात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!