अकोल्याच्या ‘श्री समर्थ’मध्ये नव्या पर्वाचा शुभारंभ ! आयुर्वेदाच्या दुसऱ्या बॅचची वाटचाल सुरू

    0
    2

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशन्स, अकोला अंतर्गत श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व श्री समर्थ कॉलेज ऑफ फिजिओथेरपीकडून आयोजित स्वागत, उद्घाटन व दीक्षारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. फिजिओथेरपी कॉलेजच्या पहिल्या बॅचचे स्वागत व आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या बॅचच्या शैक्षणिक वाटचालीचा शुभारंभ हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला. कार्यक्रमाची सुरुवात आरोग्याचे आराध्य दैवत भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाने झाली. आरोग्य, ज्ञान, कल्याण आणि मानवसेवेच्या पवित्र भावनेला उजाळा देणाऱ्या या पूजनानंतर, संविधान दिनाचे औचित्य साधून भारताच्या संविधानाचे पूजन खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

    भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांप्रती आदर व्यक्त करणारा हा प्रसंग विशेष औचित्याचा ठरला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाला अकोल्याचे खा.अनुप धोत्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशन्सचे अध्यक्ष प्रो.नितीन बाठे यांनी भूषविले. तसेच आयुष अलायन्स फॉर प्रोग्रेसिव्ह ट्रान्सफॉर्मेटिव्ह अॅक्शन्स, पुणे येथील संचालक प्रो.डॉ.प्रणिता जोशी देशमुख, ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. विनीत हिंगणकर व ज्येष्ठ फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉ. हर्षल वानखडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
    संस्थेच्या मातोश्री सुमनताई बाठे, प्रो. जयश्री बाठे, राजेश बाठे, प्रो. किशोर कोरपे, प्रो. किशोर रत्नपारखी आणि प्रो. योगेश जोशी यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने संस्थेच्या शैक्षणिक विस्ताराला सातत्याने दिशा मिळत असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न अधोरेखित झाला.
    श्री समर्थ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप अढाव यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीची दिशा, आयुर्वेद शिक्षणाची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांमधील शिस्त, अध्ययनातील सातत्य आणि सामाजिक जबाबदारी यांविषयी मार्गदर्शन केले. पारंपरिक आयुर्वेद ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देऊन सक्षम आरोग्यसेवक घडविण्याचा संस्थेचा दृष्टिकोन त्यांनी स्पष्ट केला.
    प्रो. डॉ. प्रणिता जोशी देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आयुर्वेद आणि आरोग्यसेवेतील ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग, बदलत्या वैद्यकीय क्षेत्रातील संधी आणि विद्यार्थ्यांनी आत्मसात करावयाची जबाबदारी, संवेदनशीलता व निरंतर अध्ययनाची वृत्ती यावर भर दिला. आरोग्यसेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
    डॉ. हर्षल वानखडे यांनी फिजिओथेरपी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, रुग्ण पुनर्वसनातील फिजिओथेरपिस्टची भूमिका आणि रुग्णांना पुन्हा आत्मविश्वासाने व स्वावलंबी जीवन जगण्यास सक्षम करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. फिजिओथेरपी ही केवळ हालचालींच्या उपचारांपुरती मर्यादित नसून रुग्णाच्या आत्मविश्वास, स्वावलंबन आणि जीवनमान उंचावणारी सेवा आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
    डॉ. विनीत हिंगणकर यांनी ध्वनिसंदेशाद्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान, शिस्त, प्रामाणिकपणा आणि रुग्णांप्रती संवेदनशीलता यांचे महत्त्व विशद केले.
    प्रमुख अतिथी माननीय खासदार अनुपजी धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक विकास यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, कठोर परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून ती साकार करावीत, तसेच प्राप्त ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो. नितीन बाठे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्था केवळ पदवी प्रदान करणारे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, कौशल्य निर्मितीसाठी आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी कार्यरत असलेले व्यासपीठ आहे, असे सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा आणि मानवता या मूल्यांच्या आधारावर सक्षम व संवेदनशील व्यावसायिक घडविण्याचा संस्थेचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपप्राचार्य प्रेमेंद्र पळसपगार यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. विजय घोगरे यांनी केले.
    या दीक्षारंभ कार्यक्रमाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, शैक्षणिक जबाबदाऱ्या, संस्थेची संस्कृती, भविष्यातील करिअर संधी आणि व्यावसायिक जीवनातील अपेक्षा यांची ओळख करून देण्यात आली. “ज्ञानाने सक्षम व्हा, कौशल्याने उत्कृष्टता साधा आणि संवेदनशीलतेने मानवसेवा करा” हा संदेश विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरला.
    फिजिओथेरपीच्या पहिल्या बॅचचे स्वागत आणि आयुर्वेदाच्या दुसऱ्या बॅचच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात हा श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशन्सच्या शैक्षणिक विस्तारातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. ज्ञान, कौशल्य आणि सेवाभाव यांच्या समन्वयातून सक्षम, कुशल व समाजाभिमुख आरोग्यसेवक घडविण्याच्या संस्थेच्या ध्येयाला या कार्यक्रमाने नवी दिशा आणि ऊर्जा प्रदान केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!