नगरसेवक देव यांना खोट्या प्रकरणात गोवण्याचा कट ?निष्पक्ष चौकशीची अकोला SP कडे वंचितची मागणी

    0
    5

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : नगरसेवक निलेश देव यांची राजकीय व सामाजिक प्रतिमा मलिन करण्यासाठी धादांत खोटे आरोप लाऊन पोलीस ठाण्यात तक्रार देऊन, राजकीय दबाव आणून देव यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचे कुंभाड रचले जात आहे. असा आरोप करून या संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रम लक्षात घेता, तक्रारीमागील पार्श्वभूमी, संभाव्य राजकीय हस्तक्षेप, तक्रारीत नमूद आरोपांची सत्यता यांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

    अकोला शहरात तीव्र पाणीटंचाई असताना जलतरण तलावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आल्याचा मुद्दा वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निलेश देव यांनी उपस्थित केला करून त्यांनी प्रशासनाला जाब विचारला होता. मात्र, या प्रश्नावरून वस्तुस्थिती समोर आणण्याऐवजी नगरसेवक निलेश देव यांना कथित खोट्या आरोपांमध्ये गोवण्याचा आणि त्यांची राजकीय व सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

    अकोला शहरातील खेडकर नगर येथील साकला हायड्रंटचे सुनील साकला यांनी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनसह संबंधित कार्यालयांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. या तक्रारीत नगरसेवक निलेश देव यांचे नाव नमूद असून अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला पाठविणे, घरात अनधिकृत प्रवेश आणि अन्य गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याचे समजते. मात्र या कथित घटनेशी नगरसेवक निलेश देव यांचा कोणताही संबंध नाही. केवळ तक्रारीत नावाचा उल्लेख झाला म्हणून कोणालाही दोषी ठरविता येणार नाही. प्रत्येक आरोपाची पुराव्यांच्या आधारे पडताळणी झाली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे.

    संबंधित दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भूमिका आणि संबंधित आदेशांची पडताळणी करावी. तसेच जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन पोलिस व प्रशासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

    जनतेच्या पाणीप्रश्नावर आवाज उठविणे हा गुन्हा नाही !

    लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारणे हा लोकशाही अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर केल्यामुळे कोणावरही दबाव निर्माण होऊ नये अथवा पोलिस तक्रारींचा वापर बदनामीचे साधन म्हणून होऊ नये. तक्रारींची चौकशी व्हावी, मात्र चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरविण्याची घाई करू नये, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे.

    या प्रकरणाची ४८ तासांच्या आत प्राथमिक चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे, माजी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, विरोधी पक्षनेते डॉ झिशान हुसेन, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते व नगरसेवक निलेश देव, नगरसेवक सुनील इन्नानी, पश्चिम महानगर अध्यक्ष हाजी मजहर खान, नगरसेविका जयश्री बहाद्दुरकर, नगरसेविका उज्वला पातोडे, नगरसेवक शेख शमसु शेख साबीर,शिवसेना उबाठा मनपा गटनेते विजय इंगळे, नगरसेवक अजय खुमकर, नगरसेवक शंकरराव लंगोटे, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश देव, महानगर अध्यक्ष पश्चिम हाजी मजहर खान, नगरसेविका जयश्री बहाद्दुरकर, नगरसेविका उज्वला पातोडे, नगरसेवक शेख शमसु शेख साबीर, महानगर महासचिव गजानन गवई, राजकुमार दामोदर, प्रविण पातोडे, पुरूषोत्तम वानखडे, नितीन सपकाळ, आकाश जंजाळ, सुरज दामोदर, विकास सदांशिव, आशिष सोनोने, संतोष गवई आदी उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!