अकोला गोरक्षण पॉवर हाऊस समोर युवकाचा खून ! आठवड्यात दोन हत्या

    0
    5

    • शहरातील अंड्याच्या गाड्या बनल्या ‘दारू पिण्याचे अड्डे • अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : शहरातील गोरक्षण रोडवरील मदर डेअरी जवळ झालेल्या आपसी वादातून तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केल्याने एका युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी रात्री घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली.शहरातील जवाहरनगर येथील खूनाची शाई वाळण्यापुर्वी काल पुन्हा एक खून झाला.एका आठवड्यात हत्येची दुसरी धक्कादायक घटना घडली. सलग घडणाऱ्या हत्यांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावर हाऊस समोर असलेल्या मदर डेअरी जवळ आम्लेट अंड्याचा गाडीवर काल शुक्रवार दि. २७ नोव्हेंबरला रात्री घडलेल्या घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार, मृतक आकाश गवई हा अकोल्यातील कृषी नगर येथील रहिवासी होता. शुक्रवारी रात्री गोरक्षण रोडवरील पावर हाऊस समोर, मदर डेअरी जवळील आकाश गवई आपल्या मित्रांसोबत आम्लेट अंड्याचा गाडीवर आला होता. दरम्यान आपसी कारणावरून जोरदार वाद झाल्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आकाश गवई याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आकाशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला.

    आठवड्याभरात दुसरा खून; नागरिकांमध्ये दहशत : काही दिवसांपूर्वीच सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्या झाली होती. त्या घटनेची शाई वाळत नाही तोच पुन्हा एकदा आकाश गवईची हत्या झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    अंड्याच्या गाड्या बनल्या ‘दारू पिण्याचे अड्डे’

    शहर आणि रहिवासी भागातील आसपासच्या परिसरात रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या अंडी-आम्लेटच्या गाड्यांवर अवैध मद्यविक्री आणि दारू पिण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या गाड्यांच्या आडोशाने रात्रीच्या वेळी असामाजिक तत्त्वांचा आणि मद्यपींचा मोठा वावर असतो.

    • नशेत असलेल्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन अशा गंभीर गुन्ह्यांना निमंत्रण मिळत आहे.रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या अवैध अड्ड्यांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
      या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात आणि संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, परिसरातील अवैध धंदे आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या गाड्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!