अकोल्यात ‘दिवाळी’ चोरांची ! सणासुदीच्या गर्दीत मोबाईल चोरांचा शेकडोंना ‘खिसाकापू’ झटका

    0
    2

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांच्या अलोट गर्दीने ओसंडून वाहत असतानाच, या गर्दीचा गैरफायदा घेत मोबाईल चोरांनी नागरिकांच्या खिशावर ‘हात की सफाई’ केली आहे. खुले नाट्यगृह ते जुने बस स्थानक, जुने कापड बाजार ते गांधी चौक या मुख्य बाजारपेठांसह जठारपेठ, राऊत वाडी सारख्या रहिवासी व व्यावसायिक भागात खरेदीसाठी पाय ठेवायला जागा नव्हती. याच प्रचंड गर्दीचा आणि विस्कळीत वाहतुकीचा फायदा घेत चोरट्यांनी शेकडो नागरिकांचे महागडे मोबाईल लंपास केले. नागरिकांची दिवाळी अंधारात ढकलून चोरांनी मात्र आपली ‘दिवाळी’ साजरी केल्याचे चित्र आहे.

    वाहतुकीचा बोजवारा आणि ऑटोचालकांची हुल्लडबाजी
    बाजारपेठेत झालेल्या अलोट गर्दीमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा पार बोजवारा उडाला होता. त्यातच बेशिस्त ऑटोचालकांनी रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभी करून यात आणखीनच भर घातली. पोलीस प्रशासनाचे या वाहतूक कोंडीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. याच गोंधळाच्या आणि रेटारेटीच्या वातावरणाचा पुरेपूर गैरफायदा मोबाईल चोरांच्या टोळीने घेतला.
    पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रारींचा पाऊस
    मोबाईल चोरीला गेल्यानंतर नागरिकांनी तातडीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले. सध्या पोलिसांकडे मोबाईल चोरीच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. यासोबतच तांत्रिक तपासासाठी आणि मोबाईल ट्रॅकिंगसाठी नागरिकांनी सायबर क्राईम विभागाकडेही धाव घेतली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दरवर्षी सणासुदीच्या काळात अशा घटना घडत असताना आणि पोलिसांची ‘करडी नजर’ असल्याचा दावा केला जात असतानाही, यंदा पोलीस प्रशासनाचे कोणतेही ठोस नियोजन दिसले नाही. पुर्वीच्या घटनांवरून धडा न घेतल्यानेच चोरांचे चांगलेच ‘चांगभलं’ झाले, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
    चोरांची चांदी, मोबाईल दुकानात ग्राहकांची नवी चांदी!
    एकीकडे चोरांनी लाखो रुपयांचे मोबाईल चोरून स्वतःची दिवाळी साजरी केली असली, तरी दुसरीकडे ज्यांचे मोबाईल चोरीला गेले, त्यांना सणाच्या दिवशी नवीन मोबाईल खरेदीचा नाहक भुर्दंड सहन करावा लागला. आज शहरातील मोबाईल दुकानांमध्ये चोरीला गेलेल्या मोबाईल ऐवजी नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पोलीस आता या टोळीचा छडा लावून नागरिकांचे मोबाईल परत मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!