अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : विभागस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलच्या तीन खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या ओपन साइट गटात मोक्षदा रसाळे हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर मुलांच्या गटात अंश तारकस याने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या ओपन साइट गटात पियुषा मानेवाघ हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या तिन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना प्रभातच्या क्रीडा प्रशिक्षिका श्रुती बडे व सलोनी अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संचालक डॉ.गजानन नारे, संचालिका वंदना नारे, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, क्रीडा विभागप्रमुख स्वप्निल मांदाळे व उपविभागप्रमुख आशिष बेलोकार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.