अकोट ; सुनेच्या समक्ष मुलाचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप ! सत्र न्यायालयाचा निर्णय

    0
    3

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : दारूच्या नशेत कौटुंबिक वादातून सुनेच्या समोरच स्वतःच्या तरुण मुलाचा चाकूने गळा चिरून खून करणाऱ्या नराधम बापास अकोट सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आज मंगळवार ३ नोव्हेंबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

    बाळकृष्ण जानराव ठाकरे (वय ६७ वर्षे, रा. रामटेकपुरा, नवदुर्ग नगर, अकोट ) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल. तसेच, आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती नुकसानभरपाई म्हणून पीडित फिर्यादी सुनेला देण्यात यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

    काय आहे संपूर्ण घटना?
    ही घटना ११ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९ ते ९:३० वाजेच्या सुमारास घडली होती. आरोपी बाळकृष्ण ठाकरे हा दारूच्या आहारी गेला होता. तो दररोज दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नी मथुरा व मुलगा धनंजय ठाकरे यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करत असे. घटनेच्या रात्री आरोपीने दारूच्या नशेत पत्नी मथुरा यांना “आज तुला कापून टाकतो” अशी धमकी दिली. हा वाद ऐकून मुलगा धनंजय याने मध्यस्थी करत वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि “तुम्ही आईला का मारण्याची धमकी देत आहात?” असे विचारले.

    याचा राग अनावर झाल्याने नराधम बापाने खिशातील धारदार लहान चाकू काढला आणि सुनेच्या डोळ्यांदेखत धनंजयच्या गळ्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात धनंजयचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने (सुनेने) अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. २८/२०२४, कलम ३०२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

    १० साक्षीदारांची साक्ष ठरली महत्त्वाची
    या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. अजित देशमुख यांनी भक्कम बाजू मांडली. त्यांनी न्यायालयात एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली फिर्यादी (मृतकाची पत्नी), वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी आरोपीला शिक्षा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.

    सरकारी वकिलांचा युक्तिवाद
    शिक्षेवर युक्तिवाद करताना सरकारी वकील ॲड. अजित देशमुख यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले की, “आरोपीने अत्यंत निर्घृणपणे स्वतःच्या तरुण मुलाचा खून त्याच्या पत्नीच्या (सुनेच्या) डोळ्यांसमोर केला आहे. पीडित महिलेला लहान मुले असून तिच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीवर कोणतीही दया न दाखवता त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी.” हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!