रावणदहनाचा खर्च टाळून शेतकऱ्यांना ५१ हजाराची मदत ! निलेश देव मित्र मंडळा व स्वराज्य मित्र मंडळचा उपक्रम

    0
    5

    अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : यंदाच्या नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण नागरिकांवर आर्थिक संकटाला कोसळले आहे. अशा संकटाच्या काळात उत्सवांवर मोठा खर्च करण्याऐवजी तो पैसा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्याचा संकल्प करून जमा झालेली ५१ हजारांची मदत अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली.

    निलेश देव मित्र मंडळ, अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि स्वराज्य गणेशोत्सव मंडळ, जठार पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

    दरवर्षी दसऱ्यानिमित्त रावणदहनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र यंदा शेतकरी बांधवांवर आलेले संकट लक्षात घेता केवळ उत्सवाचा आनंद साजरा करण्यापेक्षा त्यांच्या दुःखात सहभागी होणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका निलेश देव मित्र मंडळाने घेतली. त्यामुळे रावणदहनाचा भव्य सोहळा रद्द करून त्यासाठी होणारा खर्च शेतकरी मदत निधीसाठी वळविण्याचा निर्णय घेण्यात आला.

    या निर्णयातून समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अकोलेकर नागरिक, व्यापारी, उद्योजक, रामभक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूर व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!