Homeवैद्यकीय क्षेत्रातील एक धगधगते 'किरण': डॉ. किरण लढ्ढा यांच्या सेवेचा सुवर्णमहोत्सव

वैद्यकीय क्षेत्रातील एक धगधगते ‘किरण’: डॉ. किरण लढ्ढा यांच्या सेवेचा सुवर्णमहोत्सव

अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : आजपासून ५० वर्षांपूर्वीचा काळ डोळ्यांसमोर आणला, तर एक वेगळेच चित्र उभे राहते. तो काळ असा होता जेव्हा ॲलोपॅथीकडे जाणारा रुग्णांचा ओढा खूप कमी होता. लोक जडीबुटी, पारंपरिक वैद्य, निसर्गोपचार किंवा तद्नंतर डी.एच.एम.एस. (DHMS), बी.एच.एम.एस. (BHMS) अशा डॉक्टरांकडे विश्वासाने जात असत. त्यानंतरच्या काळात एम.बी.बी.एस. (MBBS) जनरल फिजिशियन्सची लाट आली. अशा एका संक्रमण काळात, जेव्हा वैद्यकीय क्षेत्रात आजच्यासारखी फॅसिलिटी आणि स्पेशलायझेशन नव्हते, तेव्हा केवळ ‘कान, नाक आणि घसा’ (ENT) तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे धाडस एका तरुणाने केले. ते तरुण म्हणजेच अकोल्याच्या वैद्यकीय जगतात आपल्या कर्तृत्वाने नवीन प्रकाश पसरवणारे आदरणीय डॉ. किरण लढ्ढा !

रामपूर कोकर्डा ते अकोला: एक ध्येयवेडा प्रवास

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील रामपूर कोकर्डा या छोट्याशा गावातील हरीरामजी यांचे सुपुत्र असलेल्या किरण यांनी बालपणापासूनच डोळ्यात काहीतरी भव्य करण्याचे स्वप्न बाळगले होते. नागपूर वैद्यकीय विद्यापीठातून (Government Medical College, Nagpur) त्यांनी आपले एम.बी.बी.एस. पूर्ण केले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी करिअरसाठी मोठ्या शहराची वाट न धरता, विदर्भाच्या मातीची सेवा करण्यासाठी अकोला शहराची निवड केली. आणि खऱ्या अर्थाने, त्यांनी आपल्या नावाप्रमाणेच अकोल्याच्या वैद्यकीय व्यवसायात सेवाभावाची आणि विश्वासाची ‘नवीन किरणे’ पाडली.

हसतमुख चेहरा आणि ‘एथिकल’ वैद्यकीय सेवा

डॉ. किरण लढ्ढा यांच्या यशाचे सर्वात मोठे गमक म्हणजे त्यांचा हसतमुख स्वभाव. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची आस्थेने आणि प्रेमाने चौकशी करणे ही त्यांची खासियत. ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांना तर ते देवासारखे धावून आले. अनेकदा वेळप्रसंगी रुग्णांची परिस्थिती पाहून फी कमी करणे किंवा फी न घेताच उपचार करणे, हा त्यांचा स्वभाव राहिला. त्यांच्या हाताला असा काही गुण आला की, पाहता पाहता त्यांच्या क्लिनिकबाहेर सकाळपासूनच रुग्णांची रिघ लागू लागली. कालांतराने अकोल्यात कान, नाक आणि घसा क्षेत्रातील अनेक नवीन तज्ज्ञ डॉक्टर आले; स्पर्धा वाढली, तंत्रज्ञान बदलले. परंतु, नावाप्रमाणेच असणारे ‘किरण’ कधीही निस्तेज झाले नाही. आजच्या व्यावसायिक युगात पैसा कमावणे गरजेचे असले, तरी ‘एथिक्स’ (वैद्यकीय नैतिकता) जपूनच प्रॅक्टिस करायची, या तत्त्वावर डॉ. किरण लढ्ढा यांनी आपली ५० वर्षे घालवली आहेत.

परंपरेचा वारसा: डॉ. सोनल यांच्या रूपाने पुढील पिढी सज्ज आज ५० वर्षांचा यशस्वी टप्पा पार करून डॉ. लढ्ढा यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. वाढत्या वयानुसार अलिकडच्या काळात त्यांनी रुग्णांना तपासण्याची वेळ मर्यादित केली असली, तरी आजही अकोलेकर आणि परिसरातील रुग्णांचे प्राधान्य ‘तपासणी तर फक्त डॉ. किरण लढ्ढा यांच्याकडूनच करून घ्यायची’ याच गोष्टीला असते. काही वर्षांपूर्वी त्यांची कन्या डॉ. सोनल मोदी हिने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून कान,नाक व घसा म्हणूनच या सेवेत स्वतःला वाहून घेतले. वडिलांच्या समृद्ध मार्गदर्शनाखाली आणि अफाट अनुभवाच्या शिदोरीवर डॉ. सोनल यांनी अत्यंत कमी वेळात वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. हा वडिलांच्या निस्पृह सेवेचा वारसा पुढे नेणारा एक सुंदर दुवा ठरला आहे.

अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान : डॉ. किरण लढ्ढा यांचे व्यक्तिमत्त्व केवळ स्टेथॉस्कोप आणि क्लिनिक पुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी समाजाचे ऋण अतिशय प्रामाणिकपणे फेडले.

बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी (BGE Society): या नामांकित संस्थेत अनेक वर्षांपासून कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष पदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले.

  • माहेश्वरी समाज ट्रस्ट: समाज संघटनेत अग्रेसर राहत त्यांनी माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय आणि आदर्श काम करून दाखवले.विविध सामाजिक संस्था आणि वैद्यकीय संघटनांच्या (IMA इ.) माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात नेहमीच हिरीरीने भाग घेतला.

वयाची ७५ वी पार, पण उत्साह आजही विशीचा ! आज डॉ. किरण लढ्ढा यांनी वयाची ७५ वी (अमृत महोत्सव) पार केली आहे. पण त्यांचा उत्साह, त्यांची काम करण्याची ऊर्जा आणि त्यांची ‘खिलाडू वृत्ती’ आजच्या तरुणाईलाही लाजवेल अशी आहे. त्याच हसतमुखाने संकटांना सामोरे जाणे, रुग्णांशी हसत-खेळत मस्करी करत संवाद साधणे आणि आस्थेने त्यांची चौकशी करणे… डॉ. किरण लढ्ढा आजही त्याच ताकदीने, त्याच आपुलकीने आणि त्याच ऊर्जेने अकोलेकरांच्या सेवेसाठी आणि समाजाला मार्गदर्शनाचे दीपस्तंभ म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या या सुवर्णमहोत्सवी वैद्यकीय प्रवासाला आणि अमृतमयी जीवनप्रवासाला कोटी कोटी प्रणाम आणि पुढील निरोगी आयुष्यासाठी अकोला दिव्य परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular