Homeअकोल्यात 'मतदार नोंदणी'त धक्कादायक प्रकार उघड ! हजारो नवीन मतदारांची...

अकोल्यात ‘मतदार नोंदणी’त धक्कादायक प्रकार उघड ! हजारो नवीन मतदारांची नावे नोंदणी प्रक्रियेतून बाद ? थेट ‘SIR नोटीस’ प्राप्त

अकोला दिव्य : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : देशाचा निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेत अकोला शहरात एक खळबळजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीएलओ (BLO) कडून ऑनलाईन ‘SRI फॉर्म’ सबमिट करताना मोबाईल अॅपमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड (Bug) होत असल्याने अनेक नवीन मतदारांची नावे नोंदणी प्रक्रियेतून बाद झाली असून त्यांना थेट ‘SIR नोटीस’ प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, ‘द इंडियन एक्सप्रेस’ ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वृत्तात निवडणूक आयोगाच्या गत काळात झालेल्या एसआय.आर मध्ये आईवडिलांचे नाव, मतदार डेटा केंद्रीकरण व सॉफ्टवेअरमधील त्रुटींवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्याचाच जिवंत प्रत्यय आता अकोला शहरात पाहायला मिळत आहे.

काय आहे नेमका प्रकार ? : अकोला शहरातील रहिवासी बी संतोष आणि लक्ष्मी यांच्या मुलांचे नाव नोंदणी करताना, फॉर्म अपलोड प्रक्रियेदरम्यान हा गंभीर तांत्रिक दोष समोर आला. पहिली त्रुटी: गत काळात झालेल्या एस आय आर नंतरच्या मूळ यादीत बी.संतोष यांचा मतदारसंघ क्रमांक १११ यादी भाग क्रमांक २३८ आणि अनुक्रमांक १६ आहे. मात्र, BLO च्या मोबाईल अॅपमध्ये हा फॉर्म अपलोड करताना १६ क्रमांकावर भलतेच नाव येते, याच यादीतील क्रमांक ७१६ वर असलेल्या व्यक्तीचे नाव दाखवले जाते. धक्कादायक बाब म्हणजे, अॅपमध्ये जेव्हा ७१६ हा अनुक्रमांक स्वतंत्रपणे तपासला जातो, तेव्हा तिथेही तीच व्यक्ती दिसते. म्हणजेच एकाच व्यक्तीचे नाव अनुक्रमांक १६ आणि ७१६ अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिसते.

दुसरी त्रुटी : हाच प्रकार बी.लक्ष्मी यांच्या बाबतीत घडला. त्यांचा मूळ यादी क्रमांक १८ आहे, परंतु अॅपमध्ये १८ क्रमांकावर सीताबाई (यादी क्रमांक ७१८) नाव दाखवले जाते. आणि ७१८ वर तपासले असता तिथेही तेच नाव येते. म्हणजेच हे नावही अॅपमध्ये दोन वेळा (क्रमांक १८ आणि ७१८ वर) रिफ्लेक्ट होत आहे.

निष्पाप नवीन मतदार मुलांना बसला फटका ; मागील झालेल्या एस.आयआर मध्ये या दाम्पत्यांचे नाव असून त्यांचा अनुक्रमांक दिला असताना ‘No Link’ मधील या तांत्रिक बिघाडामुळे (Bug) सर्वात मोठा फटका संतोष व लक्ष्मी यांना स्वतःला आणि त्यांची मुले अनमोल आणि लता यांना बसला आहे.पालकांच्या नावातील या तांत्रिक त्रुटीमुळे या नवीन मतदारांचे SIR फॉर्म अपलोड करताना सिस्टीमने ते थेट ‘No Link’ (लिंक नसलेल्या) श्रेणीत टाकले. परिणामी, या तरुण मतदारांची नावे मतदार यादीत नोंदवलीच गेली नाहीत, उलट त्यांना निवडणूक विभागाकडून ‘SIR नोटीस’ प्राप्त झाल्या आहेत.

आमच्या हातात काहीच नाही – BLO ची हतबलता

या गोंधळाबाबत स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या BLO (बूथ लेव्हल ऑफिसर्स) कडे विचारणा केली असता त्यांनीही आपली हतबलता व्यक्त केली आहे. “सध्या संपूर्ण मतदार नोंदणी प्रक्रियेचे केंद्रीकरण (Centralisation) करण्यात आले आहे. सर्व डेटा दिल्लीतून नियंत्रित होत असल्याने स्थानिक पातळीवर कोणत्याही सुधारणा करण्याचे अधिकार किंवा तांत्रिक सुविधा आमच्या हातात उरलेल्या नाहीत,” असे बीएलओंनी स्पष्ट केले आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्ताला अकोल्यातून दुजोरा

काही दिवसांपूर्वीच ‘द इंडियन एक्सप्रेस’ मधील शोधपत्रकारितेच्या एका वृत्तात खळबळजनक खुलासा करण्यात आला होता. या वृत्तात निवडणूक आयोगाच्या दोन निवडणूक आयुक्तांनी (सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी) मागील झालेल्या SIR मध्ये आईवडिलांचे नाव असल्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय असंवैधानिक आहे. असा स्पष्ट पत्र दिले. तसेच मतदार यादीच्या डेटा केंद्रीकरणावर (Centralisation) आणि ECINet सॉफ्टवेअरच्या विश्वासार्हतेवर गेल्या १० महिन्यांत तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते. दिल्लीत सत्ता केंद्रीत केल्याने स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांचे अधिकार हिरावले गेले आहेत आणि सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे मतदारांचा डेटा धोक्यात आला आहे, असा इशारा त्यांनी दिला होता. अकोला शहरात या कुटुंबासह इतर अनेक नागरिकांसोबत घडलेला हा प्रकार म्हणजे याच केंद्रीय सिस्टीमच्या तांत्रिक बिघाडाचा (Bug) थेट पुरावा मानला जात आहे.

हजारो मतदार यादीतून गायब होण्याचा धोका ?

अकोला शहरात केवळ हे एकच कुटुंबच नव्हे, तर अशा शेकडो नवीन मतदारांसोबत हाच प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सिस्टीम मधील या ‘बग’ मुळे अनेक नवीन आणि पात्र मतदारांची नावे ‘नो लिंक’ मध्ये जाऊन बाद होत आहेत. यामुळे अकोल्यातील जागरूक नागरिकांनी आणि राजकीय प्रतिनिधींनी आता थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. सॉफ्टवेअरमधील हा बिघाड तात्काळ दुरुस्त न झाल्यास, लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवातून शेकडो तरुण मतदार मतदानापासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular