अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला अर्बन बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मुख्य शाखा परिसरात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी गणेश पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी एकत्रितपणे अथर्वशीर्ष पठण करून गणरायाचे आशीर्वाद प्राप्त केले. कार्यक्रमादरम्यान सर्वांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य तसेच बँकेच्या निरंतर प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

गणरायाच्या सान्निध्यात आयोजित कार्यक्रमात सामाजिक संस्था, योगाभ्यास मंडळ, राष्ट्र सेविका समिति,भजनी मंडळ,एकविरा मल्टीपरपज फाउंडेशनच्या कर्णबधिर विद्यार्थांचा सहभाग तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, ग्राहक, भागधारक व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. अथर्वशीर्षाच्या मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
या प्रसंगी अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी, संचालक मंडळाचे सदस्य दिपक मायी, राहुल गोयनका, अँड.किरण खोत, प्रमोद शिंदे, अँड.भूषण काळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राध्येश्याम चिराणिया आणि बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकोला अर्बन बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळ व सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून प्रसाद वितरण करण्यात आले. तसेच अकोल्यातील ललित ट्युटोरियलचे संचालक ललित काळपांडे यांच्या सहकार्याने अथर्वशीर्ष पठण करणाऱ्या भाविकांना नित्य उपासनेचे पुस्तक भेट देण्यात आले.

• डॉ.हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्र अकोला च्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉ. पूजा महानकर, डॉ. उजाली सोमाणी, सरला देशमुख, नागेश बाजड, राजेश हेगु, संजय ठोकळ यांनी उपस्थित भक्तांची ब्लड शुगर, B.P. व ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली.
