अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : आजच्या जीवनशैलीमुळे विविध शारीरिक व्याधींचे प्रमाण वाढत असताना फिजिओथेरेपीचे महत्त्व वाढले आहे. रक्तवाहिन्या आणि हृदय संबंधित आजारांसह विविध आजार व दुखापतींनंतरच्या पुनर्वसनात फिजिओथेरेपीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. अशा परिस्थितीत अकोला शहर व परिसरात फिजिओथेरेपी शिक्षण आणि रुग्णसेवेचे एक नवे दालन उपलब्ध झाले आहे.श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ, अकोला संचलित श्री समर्थ कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी येथे भौतिकोपचार पदवी अभ्यासक्रम (BPTh) सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ६० विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेसह हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून प्राप्त प्रस्ताव, विद्यापीठाची शिफारस तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत करण्यात आलेल्या सक्षमता तपासणीच्या अहवालाच्या आधारे शासनाने ही मान्यता दिली आहे. संबंधित संस्थेच्या भौतिकोपचार पदवी अभ्यासक्रमाला परवानगी देण्याची शिफारस वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी केली होती.

दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून श्री समर्थ कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीला शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी फर्स्ट टाइम अॅफिलिएशन (प्रथम संलग्नता) ९ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्त झाले आहे. त्यामुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांना फिजिओथेरेपी पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण स्थानिक पातळीवर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेला बळकटी. : अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून रुग्णसेवेला अधिक बळकटी देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. शहरापासून जवळच्या परिसरातच हा अभ्यासक्रम उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही फिजिओथेरेपी क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी मिळणार आहे. शासनाची मान्यता आणि विद्यापीठाची संलग्नता मिळाल्याने संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे, असे संस्थेचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी सांगितले.
