Homeअकोल्यात नकली गुटखा प्रकरण : अखेर गौरव शर्माला अटक ; इतरांचा शोध...

अकोल्यात नकली गुटखा प्रकरण : अखेर गौरव शर्माला अटक ; इतरांचा शोध सुरू

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेल्या विविध कंपन्यांचे बनावट गुटखा तयार करून त्याचा पुरवठा व विक्री करण्याचा प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी गौरव अशोक शर्मा याला अखेर खदान पोलिसांनी काल शनिवारी अटक केली. अकोल्यातील एमआयडीसी व इतर भागांत अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी जुलै महिन्यात धाडी टाकून बनावट गुटखा रॅकेटचा पर्दाफाश केला, तेव्हापासून मुख्य सूत्रधार गौरव शर्मा हा फरार होता.

अकोला औद्योगिक वसाहतीत एका गोडाऊनमध्ये विविध कंपन्यांचे बनावट गुटखा तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषधी विभागाच्या अकोला जिल्हा विभागाने पोलिसांना सोबत घेऊन या ठिकाणी छापा टाकून तयार केलेल्या गुटखा पुडी, गुटखा तयार करण्याचा कच्चा मालासह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी खदान पोलिस ठाण्यात अन्न व सुरक्षा मानक अधिनियमांतर्गत गौरव शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गौरव शर्मा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला कायद्यानुसार अटक करण्यात आली.

याप्रकरणाची हकीकत अशी की, एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील स्थानिक गुन्हे शाखा, अकोला तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईत बनावट गुटखा तयार करण्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, गुटखा मॅन्युफॅक्चरिंग मशीन, पॅकिंग मशीन व इतर साहित्य असा एकूण १ कोटी ६५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान अकोला येथील बलोदे ले-आउट येथील रहिवासी गौरव शर्मा हाच एमआयडीसी परिसरात गुटखा तयार करून अकोला परिसरात त्याचा पुरवठा व विक्री केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. तसेच खदान पोलिस ठाण्यातील आणखी एका गुन्ह्यात आरोपी गुलशन गुलानी याचा गुटख्याच्या मुद्देमाल पुरवठ्यामध्ये सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. उपलब्ध कागदपत्रे, जप्त मुद्देमाल व इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू केला. या प्रकरणात गुटखा निर्मिती, पुरवठा व विक्रीच्या साखळीशी संबंधित अन्य व्यक्तींचाही सहभाग आहे का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

ही कारवाई अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक गोपाल जाधव यांच्यासह खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक मयुरी सावंत, पोलीस अंमलदार दिनकर धुरंधर, भूषण मोरे, आकाश राठोड, शिवकुमार दुबे आणि गजानन अंबोरे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular