अकोला दिव्य : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : आजच्या विदर्भात अर्थात पुर्वश्रमीच्या बेरार प्रदेशात १८५३ पर्यंत शताब्दी काळापूर्वीचीच शिक्षण प्रणाली कायम होती. मात्र इंग्रज सरकारने येथील सूत्रे हातात घेतल्यानंतर इंग्रजी शिक्षण आणि त्या माध्यमातून इंग्रजी संस्कृतीचा प्रसार बेरारमध्ये सुरु झाला. या काळात शिक्षण देण्याचे कार्य केवळ ठराविक समाज करीत होते. शिक्षण संदर्भात निजाम सरकार हे स्वतःची जबाबदारी गौण समजत होते. मात्र इंग्रज सरकारच्या कार्यकाळात शिक्षण कार्यप्रणाली बदलली. इंग्रज सरकारने स्वतःहून काही शाळा सुरु करुन त्यांचे व्यवस्थापन स्वतःच्या हातात ठेवल्याने साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार हळूहळू वाढू लागली.

बेरारमध्ये पहिली सरकारी शाळा १८६० आणि पहिलें महाविद्यालय १८६१ मध्ये सुरु झाले. शाळेचे पहिले हेडमास्तर संभवतः जेम्स स्कॉजी होते. ब्रिटीश सरकारने आपल्या कार्यकाळात महिला शिक्षणाकडे लक्ष देणे सुरु केले. अकोला येथे वर्ष १८६७ च्या नोव्हेंबर महिन्यात ( Government Girl School ) शासकीय कन्या शाळा सुरु करण्यात आली. संपूर्ण बेरारमध्ये ही मुलींची शाळा होती. २ जुलै १९३६ रोजी कन्या शाळेचे रुपांतर हायस्कूलमध्ये (Government Girl High School) करण्यात आले. या शाळेचे पहिले हेडमास्तर खेडकर होते. त्यांनी त्या काळी बी.ए.पर्यंत शिक्षण घेतले होते.
वर्ष १८६७ च्या दरम्यान अकोल्यात केवळ दोन माध्यमिक शाळा होत्या. हळूहळू त्यांची संख्या वाढू लागली. ज्यावेळी येथे इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली.तोपर्यंत मॅट्रीकची परीक्षा मुंबईला घेतल्या जात होती. त्या काळात नागपूर एज्युकेशन बोर्ड अस्तित्वामध्ये नव्हते. सुरुवातीला अकोला, अमरावती इत्यादी शहरातील विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी मुंबईला जात होते. त्यांच्यासोबत कोण्यातरी एका महाविद्यालयाचे हेडमास्तर देखरेखसाठी जात होते. मात्र वर्ष १८७५ नंतर विद्यार्थ्यांच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे मुंबई बोर्डाची परीक्षा बेरारमध्ये घेण्याला सुरुवात झाली.परीक्षा केंद्र कधी अकोला, कधी अमरावती तर कधी खामगावला राहत होते. संपूर्ण बेरारमधील विद्यार्थी त्या केंद्रावर जावून परीक्षा देत होते.
विद्यालयाप्रमाणे महाविद्यालयाची पदवी परीक्षा देखील मुंबईत घेतल्या जात होती. कालांतराने नागपूरचे महाविद्यालय देखील अलाहाबाद विश्वविद्यालयाला जोडल्याने पदवी परीक्षा अलाहाबाद विश्वविद्यालयाकडून घेतल्या जात होती. वर्ष १९२३ मध्ये नागपूर विश्वविद्यालयाची स्थापना झाली अलाहाबाद विश्वविद्यालयाचे प्रभूत्व संपुष्टात आले.
संपूर्ण बेरारमधील तरुणींमध्ये कला स्नातक पदवी परीक्षा अर्थात B.A.ची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान अकोला निवासी रोहिणी खेडकर यांनी पटकावला आहे. १८७६ मध्ये रोहिणी खेडकर यांनी ही पदवी प्राप्त केली. सर्वप्रथम महिला पदवीधारक होण्याच्या या सन्मानाबद्दल रोहिणी खेडकर यांची हत्तीवर बसवून मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा शहरातील माहौल कांहीं वेगळाच होता. बी.ए.पदवी प्राप्त त्या अकोल्याच्या पहिल्या तरुणी होत्या. रोहिणी खेडकर यांच्या बी. ए. होण्याच्या दोन वर्षापूर्वी १८७४ मध्ये महाजन यांनी एम. ए. उत्तीर्ण केले. ते शहरातील एम. ए. झालेली पहिली व्यक्ती होते.

हळूहळू शिक्षणाचा प्रसार प्रचार होवून शिक्षण कोण्या एका खास समाज किंवा जातीपर्यंत सिमित न राहता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले. मागासवर्गीयांना साक्षर करण्याचे कार्य अकोला येथे वर्ष १८८५ मध्ये विश्वनाथ नारायण गोठवाकर यांनी केले. यासाठी अक्कलकोट गावामध्ये (आजच्या जूने शहरातील अक्कलकोट) शाळा सुरु करुन त्यामध्ये मागासवर्गीयांना शिक्षण देत होते. काँग्रेस पक्षात नवीन उत्साह संचारित करण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी हाती घेतलेल्या नवीन कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षण एक होते. १९०६ मध्ये महर्षी दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये राष्ट्रीय शिक्षणाचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शिक्षण कार्यक्रमाला सर्वांत जास्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक प्रमुख शहरामध्ये टिळक राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली. अकोला येथे अँड देसाई आणि मराठे यांच्या प्रयत्नांनी दिनांक ४ डिसेंबर १९०८ मध्ये टिळक राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली.
• दिंनाक १८ सप्टेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या आज इतवार या सदरातून
ता.का : आज महाराष्ट्रसह देशातील शिक्षण व्यवस्थेवर तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी महिलांसाठी विविध योजना राबवित आहेत. वर्ष २०२३ मध्ये लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असताना, ते लागू झाले नाही. महिला आरक्षण आणि रोख रकमेचा योजनांची महिलांना खरंच गरज आहे की…. ? हा प्रश्न इंग्रजांनी केलेल्या कामातून निर्माण होतो की नाही ?