अकोल्यात ‘हक्काचं शहर अभियान’ ! काँग्रेस पक्ष शहर परिवर्तन गटाचे आवाहन

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेस पक्षातर्फे राज्यात प्रत्येक शहरात, शहर परिवर्तन गट स्थापन करून ‘’हक्काचं शहर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अकोला शहरातील रस्ते, अपुरा पाणी पुरवठा, घनकचरा, घरकुल योजना, प्रदुषण व अन्य नागरी सुविधांच्या प्रश्नांवर नागरीकांना सोबत घेवून शहर परिवर्तन गटाची स्थापना करून आंदोलन, मोर्चे व निदर्शने करणार आहोत. अशी माहिती अकोला ग्रामीण आणि अकोला महानगर कॉंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्यक्ष कर, अधिभार, शुल्क व दंड तसेच राज्य सरकारची निधी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसुल मिळतो. मात्र त्या तुलनेत नागरीकांना अपेक्षित दर्जाच्या नागरी सुविधा मिळत नाही. या अभियानाच्या माध्यमातून यासाठी आवाज उठविण्यात येणार आहे. नागरीकांच्या प्रश्नावर जनजागृती करीत तरूणांना एकत्रित करून आंदोलन, जनसुनावणी व नागरीकांच्या सहभागातून प्रश्न मार्गी लावण्यात येईल. शहरातील नागरीक, पत्रकार, लेखक, कलावंत, डॉक्टर, शिक्षक, आर्किटेक्ट, गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, वकील, विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त अधिकारी आदींचा समावेश असलेली तज्ञ समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती अकोला जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश तायडे यांनी दिली.

हक्काचे शहर हे अभियान केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून सातत्याने चालणारी लोक चळवळ असेल व नागरीकांच्या प्रश्नावर सातत्याने चर्चा करण्यासाठी शॅडो जनरल बॉडी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अकोला महानगर अध्यक्ष महेंद्र गवई यांनी यावेळी दिली.

हक्काचं शहर हे केवळ घोषवाक्य न राहता शहरातील प्रत्येक नागरीकाला दर्जेदार नागरी सुविधा, पारदर्शक प्रशासन व विकास प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रभावी चळवळ बनविणार असल्याची माहिती यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन यांनी दिली.

पत्रकार परिषदेस अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश तायडे, महानगर अध्यक्ष महेंद्र गवई, अकोला महापालिका विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. झिशान हुसेन, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश सचिव अक्षय राऊत यांनी संपूर्ण भूमिका विशद केली. आभार प्रदर्शन महानगर उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक मो. इरफान, मोईन खान, योगेश थोरात, शकिल अहमद, मनिष मिश्रा, विजय तिवारी, विनोद नालट, गणेश कळसकर, प्रशांत प्रधान, विनोद मराठे, सुनिल वानखडे, सुमीत सिरसाट, विनोद आंबुसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here