Thursday, June 18, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोलेकरांच आरोग्य धोक्यात ! जुनी पाईपलाईन तात्काळ बदला : निलेश देव

अकोलेकरांच आरोग्य धोक्यात ! जुनी पाईपलाईन तात्काळ बदला : निलेश देव

अकोला दिव्य न्यूज : नियमित स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून महानगरपालिकेची थेट जबाबदारी आहे. मात्र अकोट फाईल तीन खंबे ते हनुमान चौक या दरम्यानची अंदाजे १९०० मीटर १२ इंच पी.आय. पाईपलाईन आज अत्यंत जीर्ण, फुटकी व पाणी दुषित करणारी झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना, लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मनपा गटनेता आणि नगरसेवक निलेश देव यांनी केला आहे.

संग्रहित छायाचित्र

सन २००२ मध्ये शहरातील तत्कालीन पाणीटंचाई लक्षात घेऊन वारी जलयोजनेअंतर्गत ही पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र त्यानंतर शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सन २०२१ मध्ये अकोट फाईल तीन खंबे परिसरात नवीन पाण्याची टाकी उभारून नायगाव, शिडोळ, भरत नगर, शंकर नगर, लाडीस फाईल, बापू नगर, पंचशील नगर, दम्माणी, न्यू तापडिया नगर, खरप, डुंबे वाडी तसेच प्रभाग १, २ व ३ मधील हद्दवाढ भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र वाढलेल्या लोकसंख्येचा विचार न करता आजही संपूर्ण भागाला जुन्या १२ इंच पाईपलाईनवर अवलंबून ठेवण्यात आले आहे.

गंभीर बाब म्हणजे अकोला–अकोट रस्ता विस्तारीकरणात अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम या पाईपलाईनवरून करण्यात आले. परिणामी संपूर्ण १९०० मीटर पाईपलाईन नाल्यांच्या खाली गेली असून अनेक ठिकाणी ती फुटलेली आहे. प्रत्यक्ष स्थळ पाहणीमध्ये निदर्शनास आले की, फुटलेल्या पाईपलाईनमधून नाल्यातील दूषित पाणी मिसळून ते थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. हा प्रकार केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणा नसून नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला गंभीर खेळ आहे. अशा परिस्थितीत जलजन्य आजार, संसर्गजन्य रोग व सार्वजनिक आरोग्य संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे सन २०२१ मध्ये नवीन पाण्याची टाकी उभारताना अमृत योजना अथवा इतर निधीतून जुनी पाईपलाईन बदलणे अपेक्षित होते. मात्र हा विषय दुर्लक्षित राहिल्याने आज नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे अकोट फाईल तीन खंबे (प्रताप मार्बल) ते हनुमान चौक या दरम्यानची अंदाजे १९०० मीटर जुनी १२ इंच पी.आय. पाईपलाईन तात्काळ बदलून १६ इंच क्षमतेची नवीन एच.डी.पी. पाईपलाईन टाकण्यास मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी; अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देव यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!