अकोला दिव्य न्यूज : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा व शहरात शिवसेना पक्ष संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्याच्यादृष्टीने अकोला जिल्ह्यात महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अकोला जिल्हा विशेष प्रभारी ललितभाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनात अश्विन नवले यांची शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम व मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघांसाठी चंद्रशेखर पांडे गुरुजी, तर अकोट विधानसभा मतदारसंघासाठी मंगेश काळे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी नगरसेविका उषा विरक यांची नियुक्ती करण्यात आली असून राजेश मिश्रा यांची अकोला महानगरप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय तथा पुष्पलता भाऊराव मोरे यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयातून या नियुक्त्या जाहीर केल्या.
नियुक्त पदाधिकाऱ्यांनी हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार-प्रसार करत धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीप्रमाणे संघटन विस्तारासाठी कार्य करावे आणि सर्वांना सोबत घेऊन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करावेत, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्त्यांमुळे अकोला जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असून आगामी काळात पक्ष विस्ताराला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
