अकोला दिव्य न्यूज : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यावर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. बहुतांश आमदार, खासदारांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची साथ सोडली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या हातून पक्षाची सुत्रं जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना राजधानी कोलकात्यात धक्कादायक घटना घडली आहे. अलीद्वारपूर परिसरातील एका इमारतीत आग लागून ४ हजार ईव्हीएम जळून नष्ट झाले. आग लागल्यानंतर जवळपास २४ तास अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवत होते.

मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या कौशिक चौधरी यांनी या घटनेबद्दल शंका उपस्थित केली. एका सरकारी इमारतीत लागलेल्या आगीत जवळपास ४ हजार ईव्हीएम जळून खाक झाली. या प्रकरणी एफआयआर नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती चौधरी यांनी दिली.
दक्षिण कोलकात्यामधील अलीपूर परिसरातील नऊ मजली इमारतीला भीषण आग लागली होती. या इमारतीमधील अन्य विभागांसह दक्षिण २४ परगणा जिल्हा परिषदेचं कार्यालयदेखील आहे. आगीत ४ हजार ईव्हीएम नष्ट झाली आहेत. त्यांचा वापर गेल्याच महिन्यात बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये करण्यात आला होता. विधानसभेच्या १० मतदारसंघांमध्ये ही ईव्हीएम वापरली गेली होती. मागील महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे.
कौशिक चौधरी यांनी आगीबद्दल संशय व्यक्त केला. ‘आगीची घटना सामान्य वाटत नाही. यामागे कट होता का याचा तपास सुरू आहे. आग नवव्या, दहाव्या मजल्यापर्यंत कशी पोहोचली, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे,’ असं चौधरी यांनी सांगितलं.

आधी इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला लागलेली होती. मग मधल्या मजले सुरक्षित राहिले आणि आगीनं थेट नवव्या आणि दहाव्या मजल्यांना आपल्या कवेत घेतलं. त्यामुळे यामागे कट कारस्थान आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.फॉरेन्सिकचा अहवाल आल्यावरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. त्यामुळे आपण अहवालाची प्रतीक्षा करु, असं चौधरी यांनी म्हटलं.
