जळगांव जामोद ‘धड वेगळे शीर’ प्रकरण : ठाणेदार व एलसीबी प्रमुख निलंबित

0

अकोला दिव्य न्यूज : संपूर्ण महाराष्ट्रात बुलढाणा जिल्हा पोलीस दलाची बेआब्रू करणाऱ्या जळगाव जामोद येथील बहुचर्चित ‘धड वेगळे शीर’ हत्याकांड प्रकरणात तपासातील गंभीर हलगर्जीपणा प्रकरणी आणखी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या घटनेच्या तपासात बेजवाबदारपणा दाखवील्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील यांनाही सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली.

सहा अधिकारी कर्मचारी निलंबीत !
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील यांची चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. नुकतेच जळगाव जामोद येथे नुकतेच भेट देणारे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांनी या दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक सपकाळे व तीन पोलीस अंमलदार सह चार जणांना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी निलंबीत केले होते. यामुळे कारवाई करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या सहा झाली आहे.

देऊळगाव राजाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्याकडे या दोन्ही अधिकाऱ्यांची प्राथमिक चौकशी सोपवण्यात आली असून ती सध्या सुरू आहे. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि जिल्ह्यात झालेली खाकी वर्दीची नाचक्की पाहता, ही चौकशी पूर्ण होण्याची वाट न पाहताच बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मंजुरी देत निलंबनाचे आदेश दिले.

नजीकच्या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यावर देखील कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यावरच कारवाई न करता वरिष्ठ अधिकाऱ्यावर देखील कारवाईची मागणी राजकीय नेते, सामाजिक संघटना मधून होत आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी
जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा परिसरात काही दिवसांपूर्वी एक छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळला होता. पोलिसांनी कोणतीही योग्य तपासणी किंवा खात्री न करता, हा मृतदेह एका बेपत्ता तरुणीचा असल्याचा निष्कर्ष काढला. इतकेच नव्हे तर, स्थानिक गुन्हे शाखेने त्या तरुणीच्या निष्पाप वडील आणि भावाला कथित खुनाच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या होत्या. मात्र कथित मृत तरुणी जिवंत परतल्याने त्यांचे बिंग फुटले. दिनांक २८ मे रोजी या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. ज्या तरुणीच्या खुनाच्या आरोपाखाली तिचे वडील आणि भाऊ जेलमध्ये होते, ती तरूणी चक्क जिवंतपणे पोलीस ठाण्यात हजर झाली. यांमुळे पोलिसांची मोठी नाचक्की झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here