अकोला दिव्य न्यूज : Crime News : पंतप्रधान मोदी यांनी एक वर्ष सोने खरेदी करू नये, असं आवाहन केल्यानंतर सोन्यावरील अबकारी शुल्कात तब्बल 9 टक्के वाढ करण्यात आली. नेमकी ही बाब लक्षात घेऊन भाजपच्या कामगार संघटनेच्या जोरावरच संघटनेच्या सचिवाने चक्क सोने तस्करी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. तब्बल 3.2 किलो वजनाचे 5 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विदेशी सोने तस्करी प्रकरणात भाजपच्या कामगार संघटनेचा चिटणीस अजित आचरेकर याच्यासह 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या तस्करीत विमानतळावरील सुरक्षेला चकवा देण्याची एक मोठी साखळी उघड झाली असून या कारवाईबाबत मिळालेल्या सविस्तर माहिती प्रमाणे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पहाटे अडीचच्या सुमारास विमानतळाबाहेर कारवाई करण्यात आली. डीआरआयने या मोहिमेला ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ असे नाव दिले होते.
तस्करीची अजब पद्धत
कॅप्सूलमध्ये सोने: आरोपींनी परदेशी बनावटीचे २४ कॅरेट सोन्याची धूळ मेणामध्ये (Wax Form) मिसळून त्याचे अंड्यासारख्या आकाराचे ७ कॅप्सूल बनवले होते. आंतरराष्ट्रीय विमानाने आलेल्या प्रवाशांनी (कॅरिअर्स) ही कॅप्सूल आपल्या शरीरात (पोटात) लपवून आणली होती. विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम तपासणी टाळण्यासाठी हे सोने विमानतळाच्या आतच असलेल्या एका फूड आउटलेटच्या कर्मचाऱ्याकडे सोपवण्यात आले होते.

अटक करण्यात आलेले आरोपी
या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा पर्दाफाश करताना यंत्रणांनी एकूण ७ लोकांना अटक केली आहे.अजित आचरेकर हा भाजप कामगार संघटनेचे सचिव असून त्याचा अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विमानतळावर मदत पुरवणारे ३ कंत्राटी कर्मचारी असून यामध्ये बांगलादेशी आणि श्रीलंकन नागरिकांचा समावेश आहे.
