अकोला दिव्य न्यूज : Akola land-records-crime-news : महाराष्ट्रातील महसूल विभाग भ्रष्टाचाराचे मोठे कुरण असून शासकीय, निमशासकीय आणि खाजगी इत्यादीसह सर्व प्रकारच्या जमिनींचे मोजमाप व नोंद घेणारे भुमि अभिलेख विभागामध्ये तर भ्रष्टाचार ओसंडून वाहतो. अकोला जिल्हा भुमि अभिलेख कार्यालय देखील याला अपवाद नसून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकून निलंबित झालेले पंकज पवार नंतर अकोला येथील जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात उपअधिक्षक पदावर रूजू झाले. काही महिन्यांनंतर पंकज पवार भ्रष्टाचारात असे गुंतलेले की अखेरीस शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सदर प्रकरणाची कुनकुन लागताच पवार यांना निलंबित करण्यात आले. राज्य जमावबंदी आयुक्तांनी दखल घेऊन अमरावती आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. तेव्हा अमरावती आयुक्तांनी १३ जनांची चौकशी समिती गठीत केली. या समितीने कागदपत्रांची सखोल तपासणी करून केलेल्या चौकशीचा अहवाल सादर केला. सदर अहवालानंतर पवार याच्या विरोधात सिटी कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात केवळ पवार यांनीच हात ओले केले ? पवारला कोणाचं पाठबळ मिळाले होते ? पवार यांनी ज्या १५ प्रकरणांमध्ये स्वधिकाराचा वापर केला, ती प्रकरणे टेबलावर कोणी आणली ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस यादिशेने तपास करून पुर्ण प्रकार उघडकीस आणणार काय ? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून शासकीय पदावर कार्यरत असताना अधिकारांचा गैरवापर करून विविध प्रकारचे गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
माहितीनुसार, पंकज पवार यांनी दिनांक १ जून २०२३ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत पदावर असताना शासनाने सोपविलेल्या जबाबदाऱ्यांचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी पदाचा वापर करून १५ प्रकरणांमध्ये स्वाधिकारातील मिळकतींचे स्वरूप बदलणे, मृत खातेदारांच्या नावाने अर्ज स्वीकारणे, अस्थायी भाडे तत्त्वावरील मिळकत पत्रिका तयार करणे, सार्वजनिक सुविधांसाठी असलेल्या जमिनी खासगी व्यक्तींच्या नावावर करण्याचा प्रयत्न करणे तसेच अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन प्रमाणपत्रे देणे अशा विविध अनियमितता केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे शासनाचा विश्वासघात करून शासनाची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा क्रमांक २९८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १९९, २०७, ३१६(२), ३१६(५), ३१८(३) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १०६ व १३५ अन्वये दिनांक २ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित इंगोले करीत आहेत.
