अकोला दिव्य न्यूज : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: कालाय तस्मै नमः’ हा संस्कृत वाक्प्रचार आणि मराठीत याचा अर्थ ‘त्या बदलत्या किंवा सर्वशक्तिमान काळाला नमस्कार’ असा होतो. काळाची श्रेष्ठता या उक्तीने ‘काळ’ हा सर्वात बलवान आहे आणि हे सगळ्यांना मान्यच; काळाचा महिमा अगाध असं म्हटलं जातं ते उगीच नाही. काळाच्या अनुकूलता व प्रतिकूलतेनेच रंकचा राजा व राजाचा रंक होतो. आपल्या आयुष्यात काळ हाच अंतिम शासक आहे आणि प्रत्येकाला काळाच्या प्रवाहाशी जुळवून घ्यावेच लागते. जो जुळवून घेत नाही, तो भविष्यात व इतिहासात राहत नाही. एकमात्र खरं की काळाचा न्याय केवळ माणसासाठीच असतो असे नाही तर चराचरातील प्रत्येकांसाठीचा न्याय असल्यानेच काल परवा पर्यंत अत्यंत तुच्छ, अदखलपात्र ‘झुरळ’ नावाचं वादळ आज सर्वत्र घोंगावतयं !

स्वत:ला सर्वशक्तिमान समजून समाजातील लाचार, हतबल, मजबूर दिनदुबळ्यांना ‘झुरळ’ समजत, हिणवत बेलगाम जगणाऱ्याचा ठायी झुरळ एक अनुत्पादक, निरुपयोगी निरुपद्रवी किटकच ! झुरळ म्हणजे किस खेत की मुली, या अर्थाने झुरळ हा अत्यंत मामुली असा किटक ! मात्र आज किटक नावानं काळीज धडपडू लागलं आहे. आपल्या देशाचे सामाजिक व राजकीय वातावरण ‘झुरळ’ने ढवळून निघत आहे. इंग्रजीमध्ये Cockroach आणि हिंदीत तिलचट्टा या नावाने ओळखलं जाणारे झुरळ सध्या इंग्रजीतील कॉकरोच नावाने सत्तापक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांना उसण भरत आहे.
देशाच्या राजकारणात कॉकरोचने भूकंप येणार ? की काळ औघात लुप्त होईल ? केंद्रीत होत असलेल्या सत्तेच विकेंद्रीकरण होणार? जेन-झी नवीन व्यवस्थेला जन्म देणार ? सत्तेसाठी प्रायोजीत मै भी अण्णा सारखे हे कॉकरोच सत्ताधाऱ्यांना पायउतार करणार ? इत्यादी इत्यादी प्रश्नांची उत्तरे काळाच्या पोटात दडलेली आहेत. एकमात्र खरं की, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या निमित्ताने मोदी देखील धुमकेतू सारखे माहिती तंत्रज्ञानातून अवतरले व कॉकरोच जनता पार्टीचं निर्माण देखील असंच एका निमित्ताने झाले आहे महत्त्वाचे म्हणजे झुरळ आणि कॉकरोच जनता पार्टी हे कसे आणि कोणत्या कारणाने जन्मला आलेत, यामध्ये एक मोठे साम्य आहे !
लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाचं उत्तरं देणार म्हणून आशाळभूत नजरेने पाहिले जात असलेल्या या कॉकरोच पक्ष व निसर्गाचा झुरळ, या दोहांचा जन्माच कारण, यासाठीच वातावरण, पालनपोषणाचा खुराक व उपयोगीता जवळपास सारखेच आहे.
निसर्गतील झुरळे थेट निर्माण होत नाहीत. ती बाहेरील परिसर वा सामानाद्वारे घरात प्रवेश करतात. एकदा घरात आल्यावर, अन्न, पाणी, उष्णता आणि ओलसरपणा (उदा. सिंक, गटारे, कचरा कुंडी) यामुळे त्यांना राहण्यासाठी व प्रजनन करण्यासाठी पोषक वातावरण मिळते.
झुरळे घरामध्ये कसे येतात आणि त्यांची उत्पत्ती का होते. तर झुरळ
घरामध्ये प्रवेश करण्याची मुख्य कारणांमध्ये स्वयंपाकघरात सांडलेले अन्न, उघडे राहिलेले पदार्थ, फळांचे तुकडे किंवा खराब झालेला कचरा झुरळांना आकर्षित करतो. नळ गळती, साठलेले पाणी आणि दमट जागा (उदा. बाथरुम आणि सिंकखाली) झुरळांचे मुख्य आश्रयस्थान असते : दारे, खिडक्या किंवा बाथरुमच्या ड्रेनेज पाईप्समधील छोट्या भेगांमधून झुरळे सहज घरात प्रवेश करतात.
सामानाद्वारे: बाहेरून आणलेली किराणा मालाची पाकिटे, जुने खोके किंवा लाकडी फर्निचर यांच्यासोबत झुरळे किंवा त्यांची अंडी नकळत घरात येतात. झुरळांची वाढ आणि प्रजोत्पादनासाठी
मादी झुरळ एका वेळी अनेक अंडी सुरक्षित व अंधाऱ्या जागी देते. काही आठवड्यांत या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात, जी काही महिन्यांत प्रौढ होतात झुरळला योग्य वातावरण मिळाल्यास त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

होय, झुरळ पर्यावरणासाठी आणि विज्ञानासाठी अत्यंत उपयोगी आहेत. जरी ते घरात घाण व रोगराई पसरवणारे कीटक मानले जात असले, तरी निसर्गाच्या चक्रात त्यांची मोठी भूमिका आहे.
झुरळ निसर्गाचे सफाई कामगार : झुरळे जंगलातील व पर्यावरणात सडणारे, कुजणारे सेंद्रिय पदार्थ आणि मृत वनस्पती खातात. ते या कचऱ्याचे पचन करून पोषक घटकांत रूपांतर करतात, जे नंतर मातीसाठी खत म्हणून उपयोगी पडते.अन्न साखळीतील झुरळ एक महत्त्वाचा घटक असतो सरडे, पाली, पक्षी व काही सस्तन प्राण्यांचे झुरळ मुख्य अन्न आहे. झुरळमुळे या भक्षक प्राण्यांचे अस्तित्व टिकवून आहे. वैज्ञानिक व वैद्यकीय संशोधनात प्राथमिक जीवशास्त्राच्या अभ्यासात, कीटकांच्या शरीररचनेचा अभ्यास करण्यासाठी झुरळांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो याव्यतिरिक्त, त्यांच्या शरीरातील प्रतिजैविकांचा वापर करून मानवांसाठी नवीन औषधे बनवण्यावर संशोधन सुरू आहे.
काही देशांमध्ये उदा. चीन आणि आफ्रिकन देशात कोंबड्या, मासे आणि डुकरांसाठी प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून झुरळांची शेती केली जाते. तसेच, सौंदर्य प्रसाधने व पारंपारिक औषधांमध्येही झुरळांच्या अर्काचा वापर होतो. झुरळ, म्हणा किंवा कॉकरोच म्हणा, माणूस आणि त्यांच्यासाठी झुरळ बहुउपयोगी आहे. आता प्रश्न असा आहे की मानव, सस्तन प्राण्यांना आणि निसर्गास उपयुक्त असलेल्या झुरळ प्रमाणे कॉकरोच जनता पार्टीच्या जन्माला अनेक घटक कारणीभूत आहेतः आणि तसेच वातावरण देखील आहे. हे झुरळ पुराण वाचले की लक्षात येते ना ! फार जास्त लेखन प्रपंच करूनही विशेष बदल होत नाही हे जाणून आहे. पण घेतला वसा टाकू शकत नाही ना. असो !
देशभक्तीचा बुरखा घालून सर्वसामान्यांना झुरळ समजतं ‘कालाय तस्मै नमः’ पेक्षा मी आणि मीच असं मीपणा आणि दंभाला ठेचून काढण्यासाठीचं कदाचित निसर्गाने हा विचार केला असेल.अन्यथा किटकाच्या नावानं आजवर ऐवढी राळ उठली नाही.विशेष म्हणजे झुरळाची संख्या वाढण्यास आवश्यक असलेलं वातावरणा सारखंच देशात कॉकरोच जनता पार्टीच्या वाढीसाठी पोषक घटक आहेत. राजकारणात पसरलेली घाण स्वच्छ करणे काळाची गरज असून, देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कॉकरोच जनता पार्टी देखील नैसर्गिक झुरळे सारखे राजकारण, प्रशासन व समाजातील सडणारे, कुजणारे विचार आणि मृत झालेली व्यवस्था खावून ते या विघटनवादी कचऱ्याचे पचन करून पोषक घटकांत रूपांतर करतील आणि जे नंतर सर्वसमावेशक सत्तेसाठी खत म्हणून उपयोगी पडेल.असं वाटते.लबाड लांडगा ढोंग करते, लगीन करायच सोंग करते, पेक्षा आणि राजकारणसाठी देशभक्तीचा बुरखा परिधान केलेल्या पांढऱ्या सगळ्यांपेक्षा झुरळ जनता पार्टी उजवीच आहे
‘कालाय तस्मै नमः’ मानावे लागेलच ! मानवाने कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी वेळेआधी किंवा नशिबापेक्षा जास्त मिळत नाही. अशा वेळी परिस्थितीपुढे नतमस्तक होऊन काळाला वंदन करणे, हाच एकमेव पर्याय उरतो.परंतु मी आणि मीच ! या विचाराने सदैव दोन चेहऱ्याने जगणाऱ्याच्या आतमध्ये एक विचार व बाहेरून जगाला दाखवण्यास वेगळेच रूप, म्हणजेच हा दंभ होय. सामान्यतः प्रसिद्धी, लाभ किंवा मान-सन्मान मिळवण्यासाठी व्यक्ती अशी दांभिक वृत्ती बाळगते. ढोंग, सोंग, पाखंड, स्तोम, दिखावा करत मी आणि मीच असं मीपणा करणाऱ्यांना काळानं अखेरीस धुळ चारली आहे.
