Tuesday, May 19, 2026
No menu items!
No menu items!
HomeNET : अकोला -वाशिमचे काही डॉक्टर व पालक अडचणीत ! इतर बडे...

NET : अकोला -वाशिमचे काही डॉक्टर व पालक अडचणीत ! इतर बडे कोचिंगवाले रडारवर

अकोला दिव्य : नांदेड येथून सतिष सारडा : देशातील शिक्षण व्यवस्था आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)च्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात लातूर येथील कोचिंग क्लास संचालक प्राध्यापक मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्यानंतर संपूर्ण पेपरफुटीच्या घोटाळ्यात काही नामांकित डॉक्टर व गर्भश्रीमंत पालकांचाही सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे नांदेड व अकोलासह मोटेगावकरचे ज्या ज्या ठिकाणी क्लासेस आहेत त्या ठिकाणी मागील आठवड्यात छापेमारी केली होती. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे व काही इलेक्ट्रोनिक गॅझेट देखील सीबीआयने ताब्यात घेतली होती.

अकोला दिव्य ग्राफिक्स

अकोला व वाशीम मधील प्रसिद्ध डॉक्टर व काही धनवान पालक सध्या संपर्काबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. सीबीआय चौकशीच्या भीतीने मोबाईल बंद करून शहर सोडल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणा आता या आर्थिक व्यवहारांचा माग काढत असून, काळ्या पैशांचा वापर झाला का याचाही शोध घेत आहेत. या प्रकरणात अजून मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या सीबीआयकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पेपरफुटीच्या टोळीतला मोटेगावकर हा सदस्य असल्याने सीबीआयचा तपास जसा जसा सुरू आहे, तसे-तसे नीट पेपरफुटीत बडे मासे समोर येत आहेत. विशेष म्हणजे मोटेगावकरच्या RCC प्रमाणे इतर बडे कोचिंग क्लासेसचे चालकही सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यांच्या सुद्धा नीटच्या पेपरफुटीमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. हे नेक्सस मोठे असून त्याची पाळेमुळे खणणे सुरू आहे. शिवराज मोटेगावकर अजून सीबीआयला हवे ते सहकार्य करत नाही. मात्र, त्याच्या मोबाइल डाटामधून अजून माहिती समोर येऊ शकते. अटक केल्यानंतर त्याला विशेष सीबीआय कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली. अखेर सीबीआय कोर्टाने मोटेगावकरला ९ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आणखी अटकसत्र होण्याची शक्यता आहे.

आता शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे जुळून येत आहे.कारण RRC या नावाने मोटेगावकरचे राज्यात नीट परीक्षासंदर्भात कोचिंग क्लासेस असून, यामाध्यमातून प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या यंत्रणांपासून ते एजंट, पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण साखळी कार्यरत असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही साखळी सीबीआयच्या रडारवर आली आहे. शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या या घोटाळ्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

याबाबत अधिकची माहिती अशी की, नीट पेपरफुटी प्रकरण केवळ राज्यापूर्तेच मर्यादेत न राहता देशभरातील मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. यात अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात प्राध्यापकांचा देखील समावेश आहे. NEET पेपरफुटीत चक्क नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)च्या अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, देशभरात 3 मे रोजी नीटची परीक्षा होती. परीक्षेच्या 10 दिवस आधीच म्हणजे 23 एप्रिल रोजीच शिवराज मोटेगावकरने नीटची प्रश्नपत्रिका मिळवली होती. चौकशीत मोटेगावकरच्या मोबाइलमध्येच नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. शिवराज मोटेगावकरने विवेक पाटील नावाच्या एका व्यक्तीला तसेच विद्यार्थ्यांना नीटची प्रश्नपत्रिका पाठवली होती, मात्र तपास यंत्रणेसमोर तो सध्या लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास टाळाटाळ करत आहे. इतकेच नव्हे तर, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने परीक्षा संपल्यानंतर या प्रश्नपत्रिकेचे सर्व तांत्रिक पुरावे देखील नष्ट केले असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, हा डेटा तपास यंत्रणांनी रिकव्हर केल्याचे समजते. त्यामुळेच मोटेगावकर गोत्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!