• थॅलेसिमिया डे केअर युनिट येथे विविध स्पर्धांचे आयोजन •
अकोला दिव्य न्यूज : जेव्हा विज्ञानाच्या मर्यादा संपतात, तेव्हा माणुसकी धावून येते. थॅलेसिमियासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्यांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचे व त्यांना जीवनदान देण्याचा वसा माजी नगराध्यक्ष तथा भाजप नगरसेवक हरिश आलिमचंदानी व त्यांच्या मित्र परिवाराने उचलला आहे. केवळ राजकारण नव्हे तर समाजकारण आणि त्यातही विशेष म्हणजे ‘आरोग्य सेवा’ हेच त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी कार्यातून सिद्ध केले आहे.
थॅलेसिमिया हा केवळ एक शारीरिक आजार नाही तर रूग्णाच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या खचविणारा आघात आहे.या परिस्थितीत ‘संकल्प फाउंडेशन’ च्या सहकार्याने बोन मॅरो ट्रान्सप्लॉंट सारख्या महागड्या शस्त्रक्रियेसाठी हरिशभाई मोलाची मदत मिळवून देतात. रूग्णांसाठी पुनर्जन्मासारखे ठरत आहे.

थॅलेसिमिया डे केअर युनिट हे केवळ उपचाराचे केंद्र राहिले नसून ते या मुलांच्या आनंदाचे माहेरघर बनले आहे. या युनिटमध्ये मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, पुरस्कार वितरण आणि स्नेहमेळावे घेतले जातात. विशेष म्हणजे, केवळ स्थानिकच नव्हे तर इतर जिल्ह्यांतील मुलेही मोठ्या संख्येने यात सहभागी होतात. आजाराच्या वेदना विसरून ही मुले जेव्हा खेळात रमतात, तेव्हा आलिमचंदानी यांच्या प्रयत्नांचे चीज झाल्याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसते.

उन्हाळ्याच्या दिवसात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होतो. अशा कठीण काळात रक्ताअभावी एकाही मुलाचा उपचार थांबू नये, यासाठी हरीशभाई व त्यांचा मित्र परिवार ढाल बनून उभा राहतो. डॉ. हेडगेवार ब्लड बँक व साईजीवन ब्लड बँक यांच्या माध्यमातून नियमितपणे रक्ताची उपलब्धता करून दिली जाते. या सेवायज्ञात केवळ आलिमचंदानीच नव्हे, तर समर्पित डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

थॅलेसिमियाग्रस्त मुलांच्या पालकांना त्यांच्या तत्पर सेवेमुळे मोठा आधार मिळतो. या कार्यक्रमात अकोला थॅलेसिमिया सोसायटीचे अध्यक्ष हरिशभाई आलिमचंदानी, दीपक भानुशाली, अश्विन पोपट, श्रीहरी ठाकरे, डॉ.मनीष पाडिया, सुशील रामटेके, ऐश्वर्या जैन, रुषाली रायबोले, नैना डेंबडा, कमल आलिमचंदानी, संदीप आलिमचंदानी यांच्यासह थॅलेसिमियाग्रस्त मुलांचे पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते. भाजप नगरसेवक आलिमचंदानी यांनी जपलेली ही संवेदनशीलता आज अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
