Wednesday, April 22, 2026
No menu items!
No menu items!
Homeसांगलीवाला शोरुमचे साव यांनी विनोद झंवर यांच्या प्रभावाने सावकारीत मालमत्ता घेतली !...

सांगलीवाला शोरुमचे साव यांनी विनोद झंवर यांच्या प्रभावाने सावकारीत मालमत्ता घेतली ! तालुका उपनिबंधकाचा अहवाल

अकोला दिव्य न्यूज : शहरातील ‘सांगलीवाला’ शोरुमचे संचालक साव यांनी अकोल्यातील आदित्य कॉर्पोरेशनचे मालक विनोद झंवर यांच्या प्रभावाने सावकारीच्या व्यवहारात अर्जदाराकडून स्थावर मालमत्तांचे खरेदीखताने हस्तांतरण केल्याचे दिसून येते. हा व्यवहार सावकारी व्यवहार असून अर्जदाराच्या तक्रारीत तथ्य आहे.वारंवार संधी देवूनही झंवर स्वतः पुरावा व उलटतपासाकरीता हजर झालेले नाहीत. त्यावरून त्यांचाविरूध्द अर्जदार यांनी घेतलेले आक्षेप त्यांना मान्य आहे.असे गंभीर निरीक्षण नोंदवून अकोला तालुका सहकारी संस्था उपनिबंधक आणि सावकाराचे निबंधक ज्योती मलिये यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १८(१) अन्वये ज्योती मलिये यांनी सादर केलेल्या या अहवालामुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे.

एकाच परिसरात राहणारे व घनिष्ठ संबंध असल्याने प्रकाश सोमाणी यांनी विनोद झंवर सोबत आर्थिक व्यवहार केला. या दरम्यान झंवर यांच्या सांगण्यानुसार उचल केल्या जाणाऱ्या रकमेवर १८ टक्के व्याज देण्याचे ठरवून सोमाणी यांनी आर्थिक देवाणघेवाण सुरू केले. घेतलेल्या रक्कमेवर ठरल्याप्रमाणे १८ टक्के व्याज दराने एका वर्षाचे व्याज ६ लाख ७९ हजार ९६० रुपये होत होते.

या हिशोबाने साडेपाच वर्षाचे व्याज ३७ लाख ३९ हजार ८२८ रुपये झाले. मुद्दल रक्कम मिळवून एकुण रक्कम ७५ लाख १७ हजार ४३६ रुपये झाली होती. त्यामधुन सोमाणी यांनी जमा केलेले २५ लाख रुपये वजा करुन एकुण रक्कम ५० लाख १७ हजार ४३६ रुपये देणे होते. व्याजाचा दर १८ टक्के ठरले असताना मात्र झंवरने मासीक ३ टक्के व्याजदराने रक्कम देतो व तोच दर ठरला होता. त्यापेक्षा कमी व्याजदर परवडत नाही असे सांगीतले.

जास्तीच्या दराने व्याज आकारणी झाल्यामुळे व्याजाची रक्कम दुप्पट आकारल्या गेली. त्यामुळे वाद निर्माण झाला. तेव्हा पुढील काळात पुन्हा फसवणुक होऊ नये व वाद वाढु नये म्हणून झालेला व्यवहार त्याच दिवशी संपुष्टात आणण्याचे ठरविले. मध्यस्थासमोर तडजोड होऊन झंवर यांना व्याजासह ६५ लाख रुपये देण्याचे ठरले आणि खरेदीमध्ये धनादेशाद्वारे दिलेली रक्कम ६७ लाख ८० हजार रुपये मिळवुन एकुण १ कोटी ३२ लाख ८० हजार रुपये ही देणे रक्कम, सोमाणी यांच्या प्लॉटची किंमत २ कोटी २५ लाख ५६ हजार ६०० रुपये या रकमेतून देणे रक्कम वजा करण्यात आली आणि सोमाणी यांना घेणे असलेले ९२ लाख ७६ हजार ६०० रूपये झंवर यांनी एक महिन्यात देण्याचे सोमाणी यांना कबुल केले होते.

अर्जदार सोमाणी यांनी ७ फेब्रुवारी २०२१ रोजी राहिलेली रक्कम ९२ लाख ७६ हजार ६०० रुपयांची मागणी केली. परंतु झंवरने कर्जाचा हिशोब व्याजासह बरोबर झाला. आता आमच्याकडे कोणतीही रक्कम राहिलेली नाही. तुमचे कागदपत्र लेटरपॅड, सह्या केलेले कोरे चेक व वडीलांची इसारचिट्ठी परत दिलेले आहेत. प्लॉट तुम्ही खरेदी करुन दिलेला आहे. त्यामुळे व्यवहार पुर्ण झाला असून कोणतीही रक्कम मिळणार नाही तुम्हाला जे करावयाचे असेल ते करा या नंतर रक्कमेची मागणी करावयाची नाही तसेच फोन सुद्धा करावयाचा नाही असे स्पष्ट सांगीतले.

अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध असताना विश्वासघात करून विनोद झंवरने अवैध सावकारी व्यवहारातून फसवणुक करुन सव्वा दोन कोटी किंमतीची मालमत्ता फक्त ६७ लाख ८० हजार रुपये मुद्दल रक्कम व त्यावरील व्याजात हडप केली. त्यामुळे सदरची तक्रार दाखल करण्याशिवाय अन्य पर्याय राहीला नाही.असे नमूद करून. बांधकाम व्यावसायिक प्रकाश जानकीलाल सोमाणी आणि त्यांच्या पत्नी जान्हवी प्रकाश सोमाणी यांनी सांगलीवाला शोरुमचे कार्तिक विजय साव व आदित्य कॉर्पोरेशनचे मालक विनोद झंवर यांच्या अकोला जिल्हा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे १ एप्रिल २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १८(१) अन्वये आदेश क्र. सावकारी/अकोला/अ.साव/प्रजा सोमाणी/१७१७/२०२१, दि.८ जुलै २०२१ नुसार या तालुका उपनिबंधकांना महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ व महाराष्ट्र सावकारी (नियमन) नियम २०१४ मधील तरतुदीन्वये चौकशी करुन त्याबाबतच सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर २०२१ मध्ये सुरू केलेल्या सुनावणीत वर्षं २०२६ पर्यंत झालेल्या तारखांमधे अर्जदार प्रकाश सोमाणी आणि गैरअर्जदार विनोद झंवर आणि कार्तिक विजय साव यांच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. विशेष म्हणजे वारंवार संधी देऊनही विनोद झंवर हे स्वतः पुरावा व उलट तपासा करीता शेवटपर्यंत हजर झाले नाहीत.

दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आणि सादर केलेल्या दस्तऐवजाची वैधता व सत्यता पडताळून चौकशी अधिकारी मलिये ह्या निष्कर्षाप्रत पोहचल्या की, प्रकाश सोमाणी यांनी कार्तिक विजय साव यांना दस्त क्रमांक ३७७८/२०२० अन्वये ५ नोव्हेंबर २०२० रोजी व दस्त क्रमांक २१९/२०२१ अन्वये ७ जानेवारी २०२१ दस्त अन्वये तसेच प्रकाश सोमाणी यांनी श्रीमती लिलादेवी गणपतलाल अग्रवाल यांना दस्त क्रमांक ३७६३/२०२० ५ नोव्हेंबर २०२० रोजी केलेल्या नोंदणीकृत खरेदीखतावर साक्षीदार म्हणून विनोद झंवर यांनी स्वाक्षरी केलेली असून प्रत्येक व्यवहारात झंवर हे साक्षीदार असणे हा केवळ निव्वळ योगायोग असू शकत नाही.

जान्हवी सोमाणी यांच्या १० लेटरहेडवर आदित्य कॉर्पोरेशनमार्फत प्रत्येकी ५ लाख रुपये मिळाले असल्याचे नमूद असून सदर व्यवहारापोटी त्यांच्या कडून विनोद झंवर यांना तारीख नमूद नसलेले १० धनादेश दिलेत.सदरची बाब विनोद झंवर हे अवैध सावकारी करीत असल्याबाबत सिध्द करण्यास पुरेशी आहे.प्रकाश सोमाणी यांच्याकडून कार्तिक साव तसेच लिलादेवी गणपतलाल अग्रवाल यांनी केलेल्या दोन्ही नोंदणीकृत खरेदीखताचे व्यवहार एकाच दिवशी ५ नोव्हेंबर २०२० रोजी झाले असून त्यावर साक्षीदार म्हणून झंवर यांची स्वाक्षरी आहे. हे व्यवहार विनोद झंवरच्या सांगण्यावरून झालेले आहेत, याची शक्यता नाकारता येत नाही.असे अहवालात नमूद केले आहे.

वारंवार संधी देवूनही पुरावा व उलटतपासासाठी स्वतः झंवर हजर झालेले नाहीत. यावरून त्यांचाविरूध्द घेतलेले आक्षेप त्यांना मान्य असल्याचा निष्कर्षाप्रत येण्यास कोणतीच हरकत नाही. तसेच प्रथमदर्शनीच आदित्य कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झंवर व्याजाचा व्यवहार करीत असल्याचे दिसून येते. असे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

उपनिबंधक मलिये यांनी उपरोक्त निष्कर्ष नोंदवून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १८ (१) अन्वये सदरचा अहवाल सादर केला.अकोला तालुका उपनिबंधक यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले की, अर्जदार व गैरअर्जदार यांनी प्रकरणात दाखल केलेले कागदपत्रे, लेखी जवाब, सदर प्रकरणाची वस्तुस्थिती व निष्कर्षाच्या आधारे स़ोमाणी हे गैरअर्जदार झंवर यांचेकडून कर्जाऊ रक्कम व्याजाने घेण्याचा व्यवहार करीत आणि गैरअर्जदार कार्तिक विजय साव यांनी झंवर यांच्या प्रभावाने सावकारीत स्थावर मालमत्तांचे खरेदीखताने हस्तांतरण केल्याचे दिसून येते. यावरुन प्रकरणातील अर्जदार प्रकाश सोमाणी यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे व गैरअर्जदार यांचासोबत झालेला व्यवहार हा सावकारी व्यवहारातून झाल्याचे दिसून येते. तालुका उपनिबंधक मलिये यांनी स्वयंस्पष्ट अहवाल जिल्हा उपनिबंधक यांना पाठवला असून, या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!