अकोला दिव्य न्यूज : जगात सर्वाधिक तापमानाचे शहर ठरलेल्या अकोल्यात उष्माघातामुळे एकाचा बळी गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील अगरवेस भागात एका मालवाहू ऑटोमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर कोणतीही जखम नसल्याने प्राथमिक अंदाजानुसार हा उष्माघाताचा बळी असल्याचा अंदाज जुने शहर पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, अकोला शहराचा पारा ४४.२ अंशावर पोहोचला आहे.

अकोला जिल्ह्याला दरवर्षी उन्हाळ्यात तप्त उन्हाचे चटके बसत असतात. उन्हाळ्यात तापमानात कमालीची वाढ होते. जिल्ह्यात दरवर्षी तापमानाचे नवनवे विक्रम रचले जातात. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तप्त उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. उन्हाच्या तीव्र लाटेत होरपळ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अकोला देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. त्यानंतर अकोला शहरातील तापमानाने मंगळवारी ४४ अं. से.चा टप्पा देखील गाठला. आज त्यामध्ये आणखी वाढ झाली. नागपूर येथील हवामान विभागाने नोंदवलेल्या तापमानानुसार विदर्भात अकोला पुन्हा एकदा सर्वाधिक तापमानाचे शहर ठरले. अकोल्याचे तापमान बुधवारी ४४.२ अं.से. नोंदवल्या गेले आहे.
तप्त उन्हात मृतदेह आढळला
तप्त उन्हाच्या झळा बसून एकाचा बळी गेला आहे. अगरवेस भागात एका मालवाहू ऑटोमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बुधवारी दुपारी आढळून आला. याची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी परिसरातून माहिती घेतली. तो व्यक्ती सकाळी परिसरात फिरतांना आढळून आला होता. त्यानंतर दुपारी मृतदेह मालवाहू ऑटोमध्ये आढळला. कुठल्याही प्रकारे हा घातपात नसून वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा बळी ठरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
