Tuesday, April 14, 2026
No menu items!
No menu items!
Homeऐतिहासिक ! अकोला चॅरिटी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांचा निकाल !

ऐतिहासिक ! अकोला चॅरिटी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांचा निकाल !

अकोला दिव्य न्यूज : जवळपास २ दशकांपासून प्रलंबित एका प्रकरणाची लागोपाठ सुनावणी पुर्ण करून घेऊन सहायक धर्मादाय आयुक्त महेश पाटील यांनी दिलेला निर्णय अकोला चॅरिटी कार्यालयातील पहिला ऐतिहासिक निकाल ठरला आहे. सहाय्यक या निर्णयाने येणाऱ्या काळात राज्यातील सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल.

भविष्यासाठी हा आदेश ‘मार्गदर्शक’ होऊन धर्मादाय संस्थांमधील राजकारणाला चाप लागेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अकोट तालुक्यातील रुईखेड येथील श्री मारोती संस्थान सार्वजनिक ट्रस्टचे व्यवस्थापन व नियंत्रण संदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्त महेश पाटील यांनी दोन्ही बाजूचे दावे, त्यांच्या योजना फेटाळून निष्पक्ष, पारदर्शक व सुयोग्य प्रशासनासाठी स्वतंत्र योजना लागू केली. महत्वाचे म्हणजे या योजनेत ट्रस्टच्या विश्वस्तांची निवड करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत रुईखेड गावातील प्रत्येक रेशनकार्ड धारकांच्या कुटुंबातील एका सदस्याला मतदान करण्याचा हक्क दिला गेला आहे. फक्त त्या व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले असावे. यासोबतच Inquiry No. 567/2004 आणि Inquiry No. 128/2005 मधील दोन्ही योजनांचा अर्ज पाटील यांनी नामंजूर केला आहे.

श्री.मारोती संस्थान, रुईखेड या सार्वजनिक ट्रस्टच्या दोन गटांकडून वर्षं २००५ मध्ये परस्परविरोधी याचिका अकोला चॅरिटी कार्यालयात दाखल करण्यात आल्या होत्या त्यानंतर या प्रकरणाला बघता बघता २० वर्षे होत आली. दरम्यान अकोला येथे बदलून आलेले सहायक धर्मादाय आयुक्त महेश पाटील यांच्या समोर या वादाशी संबंधित चौकशी क्रमांक 567/2004 आणि चौकशी क्रमांक 128/2005 हे प्रकरण सुनावणीसाठी आले.

जवळपास दोन दशकांपासून प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यास लागोपाठ दोन्ही बाजूंची संपूर्ण सुनावणी घेत, युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला. सदर प्रकरणात मांडलेले मुद्दे सखोलपणे समजून घेत आणि सादर दस्तऐवज सुक्ष्म वाचून पाटील यांनी २ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेला निकाल पहिला ऐतिहासिक ठरला !

न्यायाधिकाऱ्यांनी Inquiry No. 567/2004 आणि Inquiry No. 128/2005 मधील दोन्ही बाजूचे दावे आणि दोन्ही बाजूंनी सादर केलेल्या त्यांच्या स्वतंत्र योजना फेटाळून लावल्या व सदर ट्रस्टच्या निष्पक्ष, पारदर्शक आणि सुयोग्य प्रशासनासाठी न्यायाधिकाऱ्यांनी स्वतःची स्वतंत्र आणि तटस्थ योजना लागू केली. यामध्ये रुईखेड गावातील प्रत्येक कुटुंबातील एकाला मतदान करण्याचा हक्क दिला. यासंबंधित गावाचा तलाठी वा सर्कल अधिकारी रुईखेड गावातील वैधरेशनकार्ड कुटुंबाची यादी तहसीलदार यांच्या मान्यतेने अकोला येथील धर्मादाय कार्यालयातील संबंधितांच्या सुपूर्द करतील आणि या यादीनुसार त्या कुटुंबातील एकाला मतदानाचा हक्क बजावता येईल.

न्यायाधिकाऱ्यांनी त्यांच्या निर्णयात असे नमूद केले आहे की, नवीन योजनेनुसार पहिल्या टप्प्यात १५ सदस्यीय विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात येईल १२ विश्वस्त निवडणुकीद्वारे निवडले जातील, तर ३ विद्यमान नोंदणीकृत विश्वस्तांना या संक्रमण कालावधीत ट्रस्टच्या दैनंदिन कामकाजाचा खोळंबा होऊ नये म्हणून समाविष्ट केले आहे. मात्र पुढील प्रत्येक कार्यकाळात सर्व विश्वस्तांना निवडणूक लढवूनच यावे लागेल. पहिल्या विश्वस्त मंडळाची रचना Charity Office च्या निरीक्षकाच्या देखरेखीखाली आणि नव्या योजनेतील नियमांनुसार केली जाईल.सहाय्यक धर्मादाय आयुक्त पाटील यांनी असे ही नमूद केले की, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केले मात्र ते ठोस व विश्वासार्ह पुराव्यांनी सिद्ध झाले नाहीत. असेही स्पष्ट नमूद केले की, कोणताही पक्ष स्वच्छ हेतूने आणि पूर्ण विश्वासार्हतेने समोर आलेला नाही. दोन्ही पक्षांनी सादर केलेल्या योजना वादग्रस्त आणि अप्रमाणित बैठका / ठरावांवर आधारित असल्यामुळे त्या ट्रस्टच्या हितासाठी योग नाहीत, असे नमूद करून त्या नामंजुर करण्यात आल्या आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० च्या कलम ५०-अ अंतर्गत न्यायाधिकाऱ्यांनी स्वतःच ट्रस्टच्या योग्य प्रशासनासाठी स्वतंत्र योजना तयार केली.

ट्रस्टचे प्रशासन सुव्यवस्थित पद्धतीने चालत नव्हते. त्यामुळे ट्रस्टच्या योग्य प्रशासनासाठी स्वतंत्र योजना आवश्यक असल्याचे ठरविण्यात आले.दिनांक २१ मे २००४ रोजी झाल्याचा दावा असलेली बैठक कायदेशीर, वैध व बंधनकारक असल्याचे सिद्ध झाले नाही. तसेच २४ नोव्हेंबर २००२ चा अविश्वास ठराव व १२ जानेवारी २००५ ची बैठक देखील कायदेशीररित्या सिद्ध झाली नाही.कोणत्याही पक्षाने स्वच्छ हेतु सिद्ध केला नाही. यासोबतच प्रशासकीय खर्चासाठी दोन्ही पक्षांनी ३० दिवसांच्या आत प्रत्येकी ५,००० सार्वजनिक विश्वस्त प्रशासन निधीत जमा करावेत, असा आदेश पाटील यांनी दिला. मात्र स्वतंत्र खर्चाबाबत कोणताही अतिरिक्त आदेश देण्यात आलेला नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!