अकोला दिव्य न्यूज : आज शाळांचे काम केवळ आणि केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित राहिलेले नाही. शाळा आजच्या काळात ज्ञानदाते नसून, त्या समाजाचे भविष्य घडविणाऱ्या संस्कारशाळा आहेत. म्हणूनच ऊर्जा संरक्षण, पर्यावरण जाणीव आणि शाश्वत विकास यांसारख्या संकल्पना शालेय शिक्षणाच्या केंद्रस्थानी यायलाच हव्यात. ऊर्जा संरक्षण हा केवळ तांत्रिक वा अभियांत्रिकी विषय नाही; तो वर्तन, संस्कार, शहाणपण आणि सामाजिक जबाबदारी यांचा एकत्रित विचार आहे. ऊर्जा साक्षर समाजाची पायाभरणी शाळेत झाली, तर उद्याची पिढी केवळ शिक्षितच नव्हे, तर निसर्गजाणकार, ऊर्जाज्ञानी आणि शाश्वत भविष्याची निर्माती ठरू शकते.

आज जग ऊर्जा संकट, हवामानबदल, संसाधनांचा तुटवडा आणि वाढते पर्यावरणीय दायित्व या चौफेर आव्हानांशी झुंज देत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणव्यवस्थेनेही स्वतःचे प्राधान्यक्रम बदलण्याची वेळ आली आहे. हवामान बदलाचे परिणाम आता केवळ वैज्ञानिक अहवालांपुरते राहिलेले नाहीत; ते दैनंदिन जीवनात स्पष्ट दिसू लागले आहेत. उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, पाण्याचे संकट, वाढती वीज मागणी आणि प्रदूषण यांचा थेट परिणाम मुलांच्या भविष्यात होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही शिक्षण आणि हवामान-जागरूकता यांचा संबंध अधिक स्पष्टपणे अधोरेखित केला जात आहे. शिक्षणक्षेत्राने हवामान-समर्थ आणि शाश्वत जीवनशैलीकडे मुलांना वळविण्याची भूमिका पार पाडली पाहिजे, असा भर वाढत आहे.
ऊर्जा संरक्षण का शिकवायचे, याचे उत्तरही इथेच दडलेले आहे. आधुनिक शिक्षणाचे ध्येय फक्त परीक्षा आणि गुण यापुरते राहू नये. विद्यार्थ्यांना परिणामांचा विचार करणारी मानसिकता विकसित करणे आवश्यक आहे. ऊर्जा साक्षरता म्हणजे फक्त वर्गातून बाहेर पडताना दिवा बंद करणे नव्हे; ती विकास आणि पर्यावरण यांच्यातील संतुलन समजून घेण्याची क्षमता आहे.
ज्या समाजात ऊर्जा साक्षर नागरिक घडतात, त्या समाजात घर, उद्योग, शेती, वाहतूक आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांत अधिक सजगता निर्माण होते. भारताचा ऊर्जा प्रवासही आज वेगाने बदलत आहे. देशात अक्षय ऊर्जेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत असून सौर ऊर्जेची एकत्रित क्षमता फेब्रुवारी २०२५ अखेर १४३.६० गिगावॉटपर्यंत पोहोचल्याची नोंद केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने केली आहे; तसेच २०२५-२६-मध्ये फेब्रुवारी २०२६ अखेर सौर ऊर्जेची संचयी उपलब्धता १,४३,६०४ मेगावॉटहून अधिक असल्याचेही मंत्रालयाच्या आकडेवारीत दिसते. याचा अर्थ असा की, भारत ऊर्जा संक्रमणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे; पण या संक्रमणात नागरिकांची, विशेषतः विद्यार्थ्यांची ऊर्जा-समज वाढवली नाही, तर तंत्रज्ञान पुढे जाईल आणि समाज मागे राहील. शाळांमध्ये ग्रीन लिटरेसी रुजविण्यासाठी प्रत्यक्ष कृतींना विशेष महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः मोजमाप करून, पाहून आणि अनुभवातून शिकले पाहिजे.
‘ग्रीन लिटरेसी’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. ग्रीन लिटरेसी म्हणजे ऊर्जा, पर्यावरण, नैसर्गिक संसाधने, शाश्वतता आणि जीवनशैली यांविषयीची सखोल, व्यवहार्य आणि मूल्याधिष्ठित समज. शाळेत ग्रीन लिटरेसीचा प्रवेश झाला की, मुलांना केवळ ‘ऊर्जा वाचवा’ असा उपदेश दिला जात नाही; तर ऊर्जा कशी निर्माण होते, कुठे खर्च होते, कुठे वाया जाते, तिचे पर्याय कोणते आणि तिच्या वापरामागील सामाजिक-पर्यावरणीय परिणाम काय असतात, याची समज दिली जाते. हाच दृष्टिकोन पुढे जाऊन जबाबदार नागरिक घडवणे हेच सर्वस्व आहे.

‘ऊर्जा-समज’ विषय स्वतंत्रपणे अभ्यासक्रमात असणे गरजेचे !प्रत्येक शाळेत ‘ग्रीन क्लबची स्थापना झाली पाहिजे. ग्रीन क्लब म्हणजे पर्यावरण शिक्षणाची जिवंत प्रयोगशाळा होय. शाळेचा ऊर्जा वापर मोजणे, पाणी संवर्धन मोहिमा, वृक्षारोपण, ई-कचरा संकलन, ऊर्जा साक्षरता सप्ताह, प्लास्टिकमुक्त परिसर, सौर उपकरणांचे प्रात्यक्षिक- अशा उपक्रमांमधून विद्यार्थी केवळ सहभागी होत नाहीत, तर नेतृत्वही शिकतात. ग्रीन क्लब शाळेचे वातावरण बदलतो आणि विद्यार्थ्यांना ‘मी बदल घडवू शकतो’ ही जाणीव देतो.
आजची मुले डिजिटल जगात वाढत आहेत. त्यांच्याकडे माहितीची कमतरता नाही; पण मूल्याधिष्ठित समज आणि शाश्वत जीवनदृष्टीची उणीव आहे. स्मार्टफोनवर त्यांना जगाची माहिती मिळते; परंतु पृथ्वीशी नाते कसे जोडायचे, संसाधनांचा संयमी वापर कसा करायचा, विकास म्हणजे केवळ वेग नव्हे, तर विवेकही आहे, हे शाळाच शिकवू शकते. म्हणूनच अभ्यासक्रमात ‘ऊर्जा-समज’ किंवा ‘एनर्जी लिटरेसी’ हा विषय स्वतंत्रपणे किंवा समन्वित पद्धतीने समाविष्ट करणे काळाची गरज आहे.
