अकोला दिव्य न्यूज : वैद्यकीय व्यावसायिक आणि रूग्ण यांच्या परस्पर विश्वासावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये संशयाचे धुके निर्माण होणे निकोप समाजव्यवस्थेसाठी धोकादायक असून दोन दिवसांपूर्वी अकोला येथील एका डॉक्टरला रूग्णाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी झालेल्या प्रकारामुळे शहरातील वैद्यकीय व्यावसायिक दहशतीत आले आहे.

उपचार दरम्यान रूग्णाचा मृत्यू होणे ही गंभीर व दुर्दैवी बाब आहे. यात शंका नाही पण रूग्ण दगावल्यानंतर सरसकटपणे डॉक्टराला जबाबदार धरून आरोप केले जातात. तेव्हा इतरही डॉक्टरांसाठी सामान्य लोकांच्या संशयाची पाल चुकचुकली की रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यात अधिक दुरावा निर्माण होऊन प्रतिकुलता वाढणे कोणालाही परवडणारे नसल्याने, प्रकरणातील दुसरीही बाजू समोर आणणे आवश्यक आहे ना !

अकोला शहरातील एका प्रतिथयश आर्थोपॅडिक डॉक्टरकडे १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ओपीडी मध्ये पाठीचा असहनिय त्रास होत असलेला आणि दोन्ही पाय जवळपास निकामी अवस्थेतील रूग्ण तपासणीला आला होता. तपासणी करून सदर रूग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी नातलगांना सांगितले. आवश्यक एवढ्या वैद्यकीय टेस्ट करून रिपोर्टही घेतले. रूग्णाला ‘सेफ्टीसेमिया’ (Septicemia) म्हणजे शरिरात पस (पु) झाला होता.यावर उपचारासाठी शस्त्रक्रिया ही गरजेचे असल्याचे नातलगांना समजवून सांगितले.एवढेच नव्हे तर एमडी फिजीशियन डॉक्टर आणि भुलतज्ज्ञाला बोलावून त्यांच्या सोबत चर्चा करून दिली. सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर सर्व बाबी समजून घेत नातेवाईकांनी शस्त्रक्रियेसाठी सम्मती दिली.
वेळ न दवडता दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला सकाळी शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. शस्त्रक्रियेसाठी रूग्णाला उपाशी पोटी ठेवण्यात आले.मात्र नातलगांनी हलगर्जीपणा केला. रूग्णाला पाणी पाजल्याने पुन्हा उपाशीपोटी ठेऊन त्याच दिवशी सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून आयसीयुमध्ये रूग्णाला शिफ्ट केले. सर्व सोपस्कार पार पडेपर्यंत हा रूग्ण फक्त २४ तासच आर्थोपॅडिक डॉक्टरकडे उपचारासाठी दाखल होता.हे महत्त्वाचे आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून रूग्णाला अकोला येथील एका खासगी क्रिटीकल सेंटरमध्ये दाखल केले. याठिकाणी १५ दिवसांपर्यंत उपचार सुरू असताना, नातेवाईकांनी स्वमर्जीने पुढील उपचारासाठी एम्स नागपूर हलवण्याचा निर्णय घेतला. रुग्णाला नागपूर येथे हस्तांतरित करण्याइतपत ती स्थिर होती आणि तिला या स्तरावरील काळजी मिळत राहिली, ही वस्तुस्थिती या गोष्टीला दुजोरा देते की प्रदान केलेले आपत्कालीन व्यवस्थापन योग्य आणि जीवन वाचवणारे होते. नातेवाईकांनी नागपूर येथील एम्स रुग्णालयात रूग्णाला दाखल केले. एम्स रुग्णालयात जवळपास १ महिन्यांपासून या रूग्णावर वैद्यकीय उपचार सुरू असताना, रुग्णांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली.
दगावलेल्या रूग्णावर आजारांसाठी सर्वात अगोदर अकोट येथे काही दिवस विविध उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे अकोट येथे काही दिवस लोटा गरम करून पाठीचा शेक करण्याची लोटा थेरपीचा देखील उपचार केला.मात्र नंतर रूग्णांची प्रकृती गंभीर झाल्याने अकोला येथील आर्थोपॅडिक डॉक्टरांकडे उपचारास आणले होते.

नागपुर येथे रूग्णाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. तेव्हा अकोला येथील डॉक्टरांनी केलेल्या उपचार व शस्त्रक्रियेला दीड ते पावणेदोन महिन्याचा कालावधी लोटला होता. या प्रकरणात अकोट येथे केलेले उपचार तद्नंतर आर्थोपॅडिक डॉक्टरांने केलेले उपचार तद्नंतर अकोला येथील खाजगी क्रिटीकल सेंटर आणि त्यानंतर नागपुरातील उपचार, असे झालेले उपचार लक्षात घेता सरसकटपणे आर्थोपॅडिक डॉक्टरांवर आरोप लावण्यात आले. याबाबतची तक्रार अकोला सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात देण्यात आली आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी लाऊन धरली.
रूग्णाचा मृत्यू होणे गंभीरबाब आहे पण मृत्यू होईपर्यंत चार डॉक्टरांनी उपचार केले असल्याने संपूर्ण वैद्यकीय अहवाल आणि यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व टिपण्णी आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याचा निरीक्षकांनी ही बाब नातलगांना समजवून सांगितली .दरम्यान या प्रकरणाची दुसरी बाजू आर्थोपॅडिक डॉक्टर तरूण राठी यांच्याकडून जाणून घेतली असता, एकंदरीत माहितीतून आणि यापुर्वी घडलेल्या घटनांनी लक्षात येते की, डॉक्टर कोणीही असला तरी तो रूग्णाच्या मृत्यूची कामना करीत नाही.
चिंताजनक रूग्णाच्या आजाराचे प्रमाण, आधिपासूनच बीपी, शुगर. थॉयराइड आणि अशा प्रकारे इतर आजार व रूग्णाचा उपचाराला मिळणारा प्रतिसाद हे देखील उपचारात व्यत्यय आणणारे महत्त्वाचे घटक आहेत. हे लक्षात घेणे येथे क्रमप्राप्त व अत्यंत महत्त्वाचे आहे.
