अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्यात सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम पेट्रोल, डिझेल वितरणावर होतं असून, आज मंगळवारी दुपारपुर्वीच सर्व पेट्रोल व डिझेल पंप बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आंदोलन आणि संपाची पुर्व कल्पना नसल्याने रविवारी अनेक पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोल, डिझेल घेतले नाही. तसेच सोमवारी सुरू झालेल्या संपामुळे कित्येक ठिकाणी पेट्रोल, डिझेल पोहोचू शकले नाही. कालपासून पेट्रोलसाठी रांगा लागल्या होत्या. आज तर सकाळी ५ वाजतापासून दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत.जर आज पेट्रोल मिळालेच नाही तर लहान पेट्रोलपंप सकाळी आणि मोठे पेट्रोलपंप दुपारपर्यंत बंद पडतील.
केंद्र सरकारने वाहतूकदारांशी संबंधित कायद्यात केलेल्या बदलांना विरोध करण्यासाठी राज्यातील सुमारे पाच लाख वाहतूकदारांनी वाहतूकदारांनी आंदोलने, निदर्शने, रास्ता रोको केला. तीन दिवस पुकारलेल्या बंदच्या काल पहिल्याच दिवशी विविध वस्तूंच्या पुरवठ्याला फटका बसला. राज्यात सुमारे १०० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला. नवी मुंबईत आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला चढवला, तर पालघरमध्ये पोलिसांची गाडी फोडण्यात आली. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी राज्यातील वाहतूकदार प्रतिनिधींची आज मंगळवारी बैठक होणार आहे. बंदमुळे पुढील दोन दिवसांत दूध, भाजीपाला, धान्य – कडधान्यासह सर्व मालवाहतुकीला, इंधन पुरवठ्याला फटका बसण्याची शक्यता आहे.
न्याय संहितेतील बदलांमुळे अपघात करून पळून जाणाऱ्या वाहनचालकांना दहा वर्षे तुरूंगवास आणि सात लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. त्याला वाहतूकदारांचा विरोध आहे. अपघातानंतर अनेकदा गर्दी, मारहाणीच्या भीतीने वाहनचालक पळून जातो, असा दावा करून शिक्षा आणि दंडाच्या रकमेला विरोध करत बंद पुकारला आहे.